– अविक्षित बैरागी
आजच्या धावपळीच्या युगात आपण ‘वापरा आणि फेकून द्या’ या संस्कृतीचे आपण कधी गुलाम झालो, हे आपले आपल्यालाच समजले नाही. कपड्याला साधा ओरखडा पडला किंवा एखादा धागा निघाला, तरी आपण तो कपडा बाद करून नवीन खरेदी करायला निघतो. पण आज एका आजोबांशी झालेल्या अनपेक्षित भेटीने मला एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विसरलेल्या जीवनमूल्याची जाणीव करून दिली. दुपारच्या वेळी रस्त्याने चालताना एक 70-75 वर्षांचे आजोबा माझ्याकडे चौकशी करायला आले. त्यांना जेंट्स टेलरचे (शिंप्याचे) दुकान हवे होते. मी त्यांना दुकानाचा पत्ता सांगितला. जाता जाता त्यांनी सांगितले की, त्यांच्या जुन्या शर्टचा खिसा उधडला आहे, तो त्यांना पुन्हा शिवून घ्यायचा आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून मी क्षणभर थबकलो. काही दिवसांपूर्वी इस्त्रीवाल्याकडून माझा नवीनच शर्ट चुकून थोडासा जळाला, अगदी लहानसे छिद्र झाले; परंतु त्याला रफू करून वापरण्याचा विचारही मी केला नाही. आजच्या प्रसंगाने ही गोष्ट प्रकर्षाने आठवली. आजच्या काळात जिथे तरुण पिढी फॅशनच्या नावाखाली दर महिन्याला नवीन कपडे खरेदी करते, तिथे हे आजोबा एका शर्टचा खिसा पुन्हा शिवून तो वापरण्याचा विचार करत होते. ही केवळ पैशांची बचत नव्हती, तर आपल्या वस्तूंबद्दल असलेली कृतज्ञता आणि आदराची भावना होती. खिसा फाटला म्हणून शर्ट फेकून न देता तो शिवून घेणे, ही केवळ एका वस्तूची दुरुस्ती नव्हती; तर ‘जे आहे त्याचे जतन करा’ या विचाराची जपणूक होती. आज मात्र वस्तूंबरोबरच नात्यांनाही किरकोळ कारणावरून फाटले तर जोडण्याऐवजी तोडून टाकण्याची घाई आपण करत आहोत. कपड्याला पडलेले छिद्र शिवता येते, तसेच नात्यांमध्ये पडलेल्या भेगाही प्रेम, संयम आणि संवादाने भरता येतात. फक्त त्यासाठी फेकून देण्यापेक्षा जपून ठेवण्याची मानसिकता हवी.
जुन्या पिढीमध्ये वस्तूंशी एक भावनिक नाते असायचे, किंबहुना घरातील सदस्य असल्यासारख्या भावना असायच्या. एखादी वस्तू खराब झाली तर ती फेकून देण्याऐवजी ती दुरुस्त करून कशी वापरता येईल, हा विचार त्यांच्या संस्कारात होता. पाण्याचा थेंबसुद्धा जपून वापरावा, अशी शिकवण आम्हा भावंडांना आमच्या वडिलांनी दिली. ती पिढी साधनांचा अपव्यय टाळत असे, वस्तूंचे मोल जाणून आणि निसर्गाशी सुसंगत असे जीवन जगत असे. आज ‘फास्ट फॅशन’मुळे कपड्यांचे ढीग साचत चालले आहेत आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. हल्ली रिसायकलिंग हा शब्द परवलीचा झाला आहे, पण प्रत्यक्षात मात्र हे चित्र फारसे दिलासादायक दिसून येत नाही. अशा वेळी या आजोबांसारखी माणसे आपल्याला या बाबतीत विचार करायला लावतात.
वस्तू असो वा नातेसंबंध, ती बदलण्यापेक्षा, दुर्लक्षित करण्याऐवजी त्यांना सांभाळणे, दुरुस्ती करणे ही एक कला आहे आणि आजच्या पिढीने जुन्या पिढीकडून शिकण्यासारखा हा एक मोठा धडा आहे. आजोबांनी शर्टचा खिसा शिवून घेण्यासाठी शिंप्याचा शोध घेतला; पण नकळत त्यांनी मला माझ्या विचारांमधील एक फाटलेला धागा दाखवून दिला. जर फाटलेल्या शर्टाला रफू करून पुन्हा वापरू शकतो, तर नात्यांमध्ये पडलेल्या भेगांना प्रेम, संवाद आणि समजुतीच्या टाक्यांनी रफू करण्यात आपल्याला अडचण का असावी? वस्तूंचेच नव्हे, तर नात्यांचे आणि मूल्यांचेही जतन करायला शिकवणारी ती छोटीशी भेट होती. म्हणूनच जुने ते केवळ जुने नसते, त्यात अनुभवाचे ‘सोने’ असते. आजोबांची ती भेट मला खूप काही शिकवून गेली. हीच शिकवण पुढच्या पिढीला दिल्यास सामाजिक हिताचे ठरेल.
Mending Relationships