तरुणीची सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार
सातपूर : प्रतिनिधी
प्रेमसंबंधातून तरुणीने लग्नास नकार दिल्याने तिच्या चेहर्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचा प्रकार सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून संबंधित संदेश, तसेच तक्रारीतील आरोपांची पडताळणी सुरू आहे.
तक्रारीनुसार, हरसूल येथे राहणार्या वैभव गायकवाड याचे संबंधित तरुणीसोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संशयिताने तरुणीशी लग्न करण्यासाठी तगादा लावला. मात्र, तरुणीने लग्नास नकार दिल्यानंतर तिच्या चेहर्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.
दरम्यान, तरुणीचे दुसर्या मुलासोबत लग्न ठरल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित मुलाच्या कुटुंबीयांना धमकावून हे लग्न मोडण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. तरुणीच्या समाजाच्या ग्रुपमध्ये संशयिताने त्यांच्या पाच ते सहा वर्षांपासून संबंध असल्याचा उल्लेख करून लग्न लावून देण्याची मागणी केली.
लग्न न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत त्यासाठी कुटुंबीयांना जबाबदार धरणारा संदेश पाठविल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तरुणीच्या तक्रारीनंतर संशयिताने पाठविलेल्या संदेशांची सत्यता, त्यामागील परिस्थिती, तसेच अॅसिड हल्ल्याच्या धमकीबाबत सातपूर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Threat of acid attack after young woman refuses marriage proposal