तीन संशयित सीसीटीव्हीत कैद
सातपूर : प्रतिनिधी
सातपूर-शिवाजीनगर परिसरातील ध्रुवनगर येथील एका अपार्टमेंटच्या आवारातून मध्यरात्री दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरीची संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. तीन संशयित युवक फुटेजमध्ये फिरताना दिसत आहेत. त्यांपैकी एकाने दुचाकी चोरून नेल्याचे दिसत आहे.
या घटनेप्रकरणी वाहनमालकाने गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही
फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू असून,
फुटेजमधील हालचालींची तपासणी केली जात आहे.
चोरीची घटना कॅमेर्यात कैद झाल्याने संशयितांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
सुरक्षित मानल्या जाणार्या सोसायटीच्या आवारातूनच दुचाकी चोरीला गेल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. सातपूर आणि शिवाजीनगर परिसरात वाहनचोरीच्या घटना वाढत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी, तसेच चोरीच्या घटनांमागील संशयितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Vehicle thieves on the rampage in the Satpur-Shivajinagar area.