विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर
दिक्षी : वार्ताहर
पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशातच ग्रामीण भागातील विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकर्यांची मोठी कोंडी झाली आहे. विहिरींमध्ये पाणी उपलब्ध असले, तरी कृषिपंपासाठी सुरळीत वीज मिळत नाही. वीज आलीच तर अतिशय कमी दाब असतो आणि मोटार सुरू करताच पुन्हा वीज गुल होते, अशा दुष्टचक्रात निफाडसह कळवण, चांदवड, बागलाण आणि येवला तालुक्यातील शेतकरी अडकले आहेत.
पाण्याअभावी चार्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतीचा मुख्य जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. विनासूचना वीजपुरवठा खंडित करणे, कमी दाब आणि पावसाचा लपंडाव यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. कमी दाबामुळे कृषिपंप सुरू होत नसल्याने विहिरीचे पाणी असूनही पिकांपर्यंत पोहोचवणे कठीण
झाले आहे.
रात्रीच्या वेळी वीज पुरवली जात असल्याने शेतकर्यांना कृषिपंप सुरू करण्यासाठी अंधारात शेतात जावे लागते. शेतशिवारात बिबट्यांचा वावर वाढल्याने रात्रीची ही फेरी जीवघेणी ठरत आहे.
एकीकडे पिके तहानलेली आणि दुसरीकडे वीज आल्यावर वन्यप्राण्यांचा धोका, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडले आहेत. पाऊस, अनियमित वीज आणि बाजारात टोमॅटोला मिळत नसलेला कवडीमोल भाव यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. अशीच स्थिती राहिल्यास आगामी द्राक्ष हंगामही संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.
दोन महिन्यांपासून पाऊस नाही. विहिरीच्या पाण्यावर पिके वाचवायची आहेत आणि द्राक्षांवर फवारणी करायची आहे; मात्र दिवसभरात आठ तासांची वीजही सुरळीत मिळत नाही. त्यामुळे हाती आलेली पिके डोळ्यांसमोर वाया जात आहेत.
-अजय गवळी, शेतकरी, नारायणटेंभीवीजपुरवठ्याअभावी शेतीकामांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतशिवारात बिबट्यांचा वावर असताना रात्री कृषिपंप सुरू करण्यासाठी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. वीज नसल्याने पिके तहानलेली आणि वीज आली म्हणून शेतात गेले तर वन्यप्राण्यांचा धोका, अशी कोंडी निर्माण झाली आहे.
-राधाकृष्ण शिंदे, शेतकरी,
आडगाव, नाशिक
A break in the rains, unannounced load-shedding, and low voltage.