इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान

इगतपुरी : प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नगरपरिषदेतर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व स्वच्छताविषयक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. यावेळी शहरात 500 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली, तसेच बुद्धविहार ते रेल्वे तलाव या परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.
अभियानात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा सहआयुक्त श्याम गोसावी, नगराध्यक्ष शालिनी खताळे, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत बुद्धविहार ते रेल्वे तळा या मार्गावर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत परिसरातील कचरा व अस्वच्छता दूर केली. स्वच्छ शहर, सुंदर शहर आणि निरोगी शहर निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.

वेस्ट टू एनर्जीवर भर

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इगतपुरी हॉटेल असोसिएशन व धम्मगिरी संस्थेच्या पदाधिकार्‍यांसोबत विशेष बैठक घेतली. कचर्‍यापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ संकल्पनेचा अभ्यास करून हॉटेल व्यावसायिक, सामाजिक संस्था व नगरपरिषदेने समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. पर्यटन व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व घटकांनी सामूहिक जबाबदारी घ्यावी, असा संदेश यातून देण्यात आला.

स्वच्छ व हरित इगतपुरीचा संकल्प

महात्मा गांधी यांच्या विचारांना कृतीची जोड देत नगरपरिषदेने वृक्षारोपण, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली. ‘स्वच्छ इगतपुरी, हरित इगतपुरी’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Planting of 500 saplings alongside a cleanliness drive in Igatpuri city.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *