प्रश्न कुत्र्यांचा; रंग राजकारणाला!

– आनंदा जाधव
कुत्रेच नाही असे शहर शोधूनही सापडणे अवघड आहे. निफाड शहरात तर वाढत्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या टेबलवर कुत्र्यांची पिल्ले सोडल्याने सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप अन् आंदोलने थांबण्याचे नाव घेत नाही. निफाड नगरपंचायतीची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपल्याने त्यात या मोकाट कुत्र्यांनी नगरपंचायत प्रशासन आणि सर्वपक्षीय नेते यांची मात्र पंचायत करून ठेवली आहे. कारण वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे हे कुत्रे मारताही येत नाहीत आणि पकडताही येत नाहीत. त्यामुळे धरलं तर चावतं अन् सोडलं तर पळतं, अशी अवघड अवस्था प्रशासनाची झाली आहे.

कुत्र्यांवरून सुरू झालेला संघर्ष थेट पोलिस स्टेशन आणि न्यायालयापर्यंत पोहोचल्याने या प्रश्नाची धग कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच शहरात डुकरांचे प्रमाणदेखील काही कमी नाही. मात्र, डुकरांचा त्रास माणसापेक्षा पिकांना अधिक होतो. त्यामुळे कुत्र्यांपरिस डुकरं बरी, अशी वयोवृद्ध नागरिक गमतीने म्हणत असली तरी अलीकडे सुरू झालेला मोकाट कुत्र्यांचा विषय निवडणुका येईपर्यंत असाच सुरू राहील, असाच अंदाज आहे.
सध्या शहरासह खेडेगावात कुत्रे पाळणे म्हणजे फॅशन झाली आहे. कुटुंबातील सदस्यांचे नाही इतके लाड कुटुंबाकडून कुत्र्यांचे पुरविले जात आहेत. हौसेला मोल नाही हे तितकेच खरे असले तरी हेच कुत्रे अनेक वेळा घरातील सदस्यांनादेखील सोडत नसल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. निफाडमध्ये तर मोकाट कुत्र्यांनी अनेक लहान बालके, ज्येेष्ठ नागरिक, महिला यांना चावा घेतल्याने अन् हेच कुत्रे टोळक्याने गल्लोगल्ली फिरत असल्याने लहान मुलांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे नगरपंचायतीचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांचे टेबलवर कुत्र्यांची पिल्ले सोडले. त्यावेळी या कृत्याला विरोध करण्यासाठी काही नगरसेवक मुख्याधिकारी यांच्या दालनात धावले, तर काहींनी या गोष्टीचे समर्थनदेखील केले. तर सत्तेसह विरोधातील काही नगरसेवकांनी या दोन्ही घटनांत तटस्थतेची भूमिका निभावली. मुख्याधिकारी कार्यालयात कुत्रे सोडले म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी नगरपंचायत कर्मचार्‍यांनी एक दिवस काळ्या फिती लावून आंदोलन केले. त्यानंतर आठ दिवसांतच भाजप कार्यकर्त्यांनीदेखील कुत्र्यांच्या भूमिकेवर नगरपंचायत कार्यालयासमोर टाळ बजाओ आंदोलन केले. परिणामी, त्याच दिवशी सायंकाळी उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांनी पत्रकार परिषद घेत, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि त्याला विरोधकांनी घातलेला खोडा याचा लेखाजोखा मांडत विकासाचे राजकारण करण्याचा सल्ला दिला. नगरपंचायतीच्या म्हणण्यानुसार शहरात 73 कुत्रे पकडून रेबिज लसीकरण करण्यात येऊन त्यांना सोडण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराने कुत्रे पकडण्याचे काम अर्धवट सोडून दिल्याने यानंतर दोन वेळा टेंडर काढूनदेखील ते कुणी भरले नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी लागणार आहे. निफाड शहरात कुत्रे किती आहेत, याची माहिती घेतली असता, नगरपंचायतीच्या पाहणीत निफाडमध्ये 86 कुत्रे आढळून आले आहेत. मग निफाडच्या प्रत्येक गल्लीबोळ, उपनगरांत कुत्र्यांचे टोळके दिसते. ती कुत्रे आली कुठून, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. त्यामुळे शहरात 86 पेक्षा जास्त कुत्रे असतील तर ती बाहेरून शहरात पाहुणे म्हणून आली असावीत अन् या आकड्यापेक्षा कमी कुत्रे असतील तर ते पाहुणे म्हणून बाहेरगावी गेले असावेत, असे समजण्यास हरकत नाही. निफाडचा वाढता विस्तार बघता, शहरात 86 पेक्षा निश्चितच जास्त कुत्री असावीत. यातही गमतीचा भाग म्हणजे, नाशिक महानगरपालिका या परिसरात कुत्रे आणून सोडत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. तर निफाडच्या आसपास असणार्‍या खेडेगावांतील नागरिकांच्या मते निफाड नगरपंचायत शहरातील कुत्रे आमच्या खेडेगावात आणून सोडत असल्याने खेडेगावात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. असे एकमेकांकडे अंगुलीनिर्देश सुरू असतानाच आता या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा, असा प्रश्न नगरपंचायतीसह खेडेगावातील नागरिकांना सतावणे साहजिकच आहे. मात्र, या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पेटा कायदा आडवा येत असल्याने ही मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे.. नाही म्हणायला मध्यंतरी भटक्या कुत्र्यांबरोबर पाळीव कुत्रेदेखील पकडल्याची ओरड काही शहरवासीयांनी केली. मुळात पाळीव कुत्रे मोकळे का सोडले गेले. कारण जी कुत्रे पकडली गेली ती गल्लीतून पकडली, मग पाळीव कुत्रे या मोकाट कुत्र्यांमध्ये आली कशी, शहरात आत्तापर्यंत 73 कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले, असे नगरपंचायत सांगते. मात्र, शहरात दररोज नवनवीन कुत्रे पहावयास मिळत आहेत. त्यामुळे या कुत्र्यांवर आवर कसा घालायचा? भाजपने कुत्र्यांवरून केलेल्या आंदोलनात कुत्र्यांऐवजी मुख्याधिकार्‍यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले. तसे बॅनरदेखील शहरात लागले होते. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आजी-माजी आमदारांनीदेखील प्रतिष्ठेचा केला होता. कारण मोकाट कुत्र्यांनी निफाड शहरात दहशत निर्माण केली आहे. कुत्र्यांचे टोळके थेट लहान बालके आणि नागरिकांवर हल्ले करीत आहेत. सध्या दसरा, दिवाळी असे महत्त्वाचे सण ऐन तोंडावर आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत गर्दीचा माहोल तयार होत आहे. अशा प्रसंगी भटक्या कुत्र्यांचा वावर आणि त्यांचे मानवावर होणारे हल्ले सुरूच राहिले तर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक वाढीस लागणार आहे. कुत्र्यांबरोबरच निफाड शहर आणि परिसरात डुकरांचादेखील मुक्त हस्ते वावर आहे. फरक इतकाच की, डुकरे माणसांना त्रास देण्याऐवजी पिकांची नासाडी करतात. घराच्या आसपास धान्य किंवा वाळवण टाकले तर ते फस्त करण्याचा सपाटा लावतात, मात्र या डुकारांबाबत कुणी अवाक्षरदेखील बोलत नाही. मात्र, आता कुत्र्यांचा विषय संवेदनशील बनला आहे. लहान मुले घराबाहेर एकटी सोडणे म्हणजे अग्निदिव्य ठरू लागले आहे. कारण कधी कोठून कुत्रे येतील अन् हल्ला करतील याचा भरवसा राहिलेला नाही. परिणामी, अशा प्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत हा विषय सामोपचाराने सोडविला तर कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याबरोबरच शहराची शांतता आणि सुरक्षिततादेखील अबाधित राहू शकेल, मात्र त्यासाठी सत्ताधार्‍यांनी विरोधकांनादेखील विश्वासात घेतले पाहिजे. कारण कुत्र्यांचा विषय हा निफाडकरांच्या समस्येशी निगडित आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत आणि वृद्धापासून ते तरुणाईपर्यंत कुत्र्यांनी कुणालाच सोडलेले नाही. त्यामुळे याप्रश्नी राजकारण नाही तर सामाजिक भावनेतून त्याकडे बघावे व हा प्रश्न कायमचा निकाली काढावा, एवढीच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

The issue is about dogs; the hue is political!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *