– मुकुंद बाविस्कर
पवार तबला अकादमी ही नाशिक शहराच्या सांगीतिक व सांस्कृतिक वैभवाचा एक भक्कम आणि अभिमानास्पद स्तंभ आहे. नाशिकला ‘तबलावादकांचे शहर’ म्हणून ओळख मिळवून देण्यात या संस्थेचा व तिच्या संस्थापकांचा सिंहाचा वाटा आहे. सन 1969 मध्ये नाशिकमधील कानडे मारुती लेन येथील पवारवाड्यात पंडित भानुदासजी पवार यांनी ‘पवार तबला क्लासेस’ची स्थापना केली.
संगीताला त्या काळात विशेष प्रतिष्ठा नसताना, केवळ 3-4 विद्यार्थ्यांपासून या उपक्रमाची सुरुवात झाली. या प्रवासामागे एक रंजक पार्श्वभूमी आहे. त्या काळात भानुदास पवार, विजय हिंगणे आणि कमलाकर वारे हे तिघे ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांच्याकडे तबल्याचे धडे घेत असत. या तिघांच्या नावातील आद्याक्षरांवरून त्यांना भाविक हे टोपणनाव मिळाले होते. पं. नाना मुळे यांच्याच प्रेरणेतून आणि सूचनेनुसार भानुदासजींनी नाशिकमध्ये तबला शिक्षणाचा क्लास सुरू केला. पुढे 1997 मध्ये पं. भानुदासजींच्या निधनानंतर त्यांचे पुत्र व शिष्य नितीन पवार यांनी क्लासचे रूपांतर पवार तबला अकादमीमध्ये केले आणि हा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेला.
अकादमीची वैशिष्ट्ये
आणि शिक्षण परंपरा :
संगीतातील घराण्यांच्या चौकटीत न अडकता, प्रत्येक घराण्यातील उत्तम वैशिष्ट्ये आणि बारकावे विद्यार्थ्यांना शिकवण्याचे धोरण पं. भानुदासजी आणि नितीन पवार यांनी कायम जपले आहे. कडक शिस्त आणि मूलभूत पाया : विद्यार्थ्याच्या हातातून निघणारा प्रत्येक बोल स्पष्ट आणि खणखणीत निघाला पाहिजे, या मूलभूत तत्त्वावर अकादमीचा पाया उभा आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे केंद्र : अकादमी गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे नाशिकमधील एक प्रमुख केंद्र म्हणून कार्यरत आहे. सध्या नाशिकमधील विविध शाखांमधून सुमारे 200 ते 300 विद्यार्थी येथे तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत. दरवर्षी मे ते नोव्हेंबर या काळात गायन, वादन व नृत्यातील सुमारे 5,000 विद्यार्थी या केंद्रावरून परीक्षा देतात. अकादमीतून शिकणार्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील अतिरिक्त गुण मिळवून देण्यासाठी ही संस्था मान्यताप्राप्त केंद्र आहे.
पं. भानुदासजींनी स्वतः पं. नाना मुळे, तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पं. नारायण जोशी, पं. ओंकार गुलवडी आणि पं. आनंद सिधये अशा उत्तुंग दिग्गजांकडून तबलावादनाचे धडे घेतले होते. अकादमीतील विद्यार्थ्यांनाही वेळोवेळी या दिग्गजांचे आणि पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, पं. नाना मुळे, पं. नारायण जोशी यांचे थेट मार्गदर्शन, व्याख्याने व कार्यशाळा लाभत असतात. त्याचप्रमाणे उस्ताद अहमद जान थिरकवा, उस्ताद शमशुद्दीन खान, उस्ताद निजामुद्दीन खान, पं. तारानाथ, पं. भाई गायतोंडे, पं. गोपीकृष्ण व पं. कार्तिक कुमार यांसारख्या महामेरूंच्या उपस्थितीने व मैफलींनी अकादमी आणि नाशिकचे रसिक समृद्ध झाले आहेत.
अकादमीच्या 57 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात हजारो विद्यार्थी तयार झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व सांस्कृतिक खात्याची शिष्यवृत्ती मिळवली असून, आकाशवाणीची ग्रेड मिळवून पूर्णवेळ संगीत क्षेत्रात कार्य करत आहेत. नितीन पवार, गिरीश पांडे, नितीन वारे, सुजीत काळे, अद्वय पवार, सारंग तत्त्ववादी, प्रशांत महाबळ, सुनील दैठणकर, प्रमोद भडकमकर, सतीश पेंडसे, मिलिंद हिंगणे, मंगेश जोशी, रोहित पंचाक्षरी, गौरव तांबे, दीपक पोतदार, कुणाल काळे, अक्षय पवार इत्यादी.
सांस्कृतिक उपक्रम
आणि संगीतोत्सव :
अकादमीतर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि नाशिकमधील सांगीतिक वातावरण जिवंत ठेवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. पं. भानुदासजी पवार स्मृती संगीत समारोहाचे 1998 पासून दरवर्षी भव्य आयोजन केले जाते. यात आतापर्यंत पं. सुरेश तळवलकर, पं. अनिंदो चटर्जी, पं. कुमार बोस, पं. नयन घोष, पं. विजय घाटे, पं. योगेश समसी, सत्यजित तळवलकर, पं. रामदास पळसुले तसेच पं. उल्हास कशाळकर, पं. अजय पोहनकर, आरती अंकलीकर व डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांनी हजेरी
लावली आहे.
‘अनुभूती’ (तबला सहवादन) :
गेल्या 10 वर्षांपासून अकादमीचे सुमारे 200 विद्यार्थी एकत्र येऊन ‘अनुभूती’ या अनोख्या तबला सहवादनाचे सादरीकरण करतात. नाशिकमधील काळाराम मंदिर, कुसुमाग्रज स्मारक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणांसह मलेशिया आणि स्पेन येथेही या कार्यक्रमाचे यशस्वी आंतरराष्ट्रीय सादरीकरण झाले आहे. दर दोन महिन्यांनी तालाभिषेक बैठक आणि वर्षातून एकदा तालाभिषेक संगीत महोत्सव आयोजित केला जातो. गुरुपौर्णिमेला सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना मंच सादर करण्याची संधी मिळते. 2024 मध्ये तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान अकादमीतर्फे करण्यात आला. संगीताच्या प्रचार-प्रसारात बजावलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सन 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पवार तबला अकादमीला ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी’ यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार व अनुदान प्रदान करण्यात आले. नाशिकच्या कानडे मारुती लेनमधील ‘पवारवाडा’ हा आज खर्या अर्थाने नाशिकच्या सांगीतिक क्षेत्रातील शिवाजी पार्क ठरला असून, थिरकणार्या बोटांची ही शाळा नाशिकचे सांस्कृतिक वैभव सातत्याने
वाढवत आहे.
संत साहित्यात नवीन भर :
परशुराम सायखेडकर नाट्य मंदिरात वारकरी सेवा समितीतर्फे आयोजित विशेष सोहळ्यात संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. अमर ठोंबरे लिखित ‘संत निवृत्तिनाथ चरित्र व कार्य’ या ग्रंथाचे प्रकाशन आणि वारकरी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथात संत निवृत्तिनाथांचे स्वतंत्र चरित्र आणि त्यांचे वारकरी संप्रदायातील अनोखे योगदान मांडले आहे. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची मांडणी : आजवर निवृत्तिनाथ हे केवळ संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू आणि आध्यात्मिक गुरू म्हणूनच ओळखले जात होते. विठ्ठलपंतांच्या निर्वाणानंतर संपूर्ण कुटुंबाचे पालकत्व स्वीकारून त्यांनी भावंडांसह समकालीन संतांना जी प्रेरणा व मार्गदर्शन दिले, त्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा सविस्तर आढावा या ग्रंथात घेतला आहे. नाथ संप्रदाय व भागवत धर्माचा समन्वय : निवृत्तिनाथ हे महाराष्ट्रात नाथ संप्रदायाचे मुख्य प्रतिनिधी मानले जातात. त्यांनी नाथ संप्रदाय आणि भागवत धर्म यांचा घडवून आणलेला समन्वय हाच पुढे वारकरी संप्रदायाचा मुख्य आधार ठरला. या मध्ये दोन भागांत विस्तृत मांडणी केली आहे. पहिला भाग (कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी) हा विठ्ठलपंतांचा संन्यास, गृहस्थाश्रम, आळंदीतील कर्मठ व्यवस्थेने केलेला छळ आणि त्यातून निर्माण झालेल्या कठीण प्रसंगांत निवृत्तिनाथांनी सांभाळलेली धुरा यावर प्रकाश टाकला आहे. तसेच 12 व्या शतकातील यादवकालीन राजवट, सामाजिक परिस्थिती आणि समकालीन धर्मपंथांच्या तुलनेत वारकरी संप्रदायाची समता, स्त्री-पुरुष समानता व कर्मकांडविरोधी भक्ती चळवळ स्पष्ट केली आहे. दुसरा भाग (अभंग विश्लेषण) हा निवृत्तिनाथांच्या उपलब्ध 377 अभंगांपैकी निवडक अभंगांचे सखोल विश्लेषण करून त्यांच्या तत्त्वज्ञानाची व कार्याची उकल केली आहे. यासाठी संत नामदेवांच्या आदी, तीर्थावळी व समाधी या चरित्रसाधनांचा आधार घेण्यात आला आहे. हा ग्रंथ केवळ एका संताचे चरित्र नसून, वारकरी संप्रदायाची जडणघडण आणि निवृत्तिनाथांची मध्यवर्ती प्रेरणा स्पष्ट करणारा एक महत्त्वपूर्ण संशोधन ग्रंथ आहे.
Pawar Tabla Academy: A Musical and Cultural Legacy