सिडको : प्रतिनिधी
अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी व चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत दोन संशयितांकडून सुमारे चार लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम जप्त केली. या कारवाईत एका महिलेसह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर येथील शुभम पार्क परिसरात राहणार्या मंजू जाधव यांच्या घरातून सोने चोरीला गेल्याची तक्रार 2 ऑक्टोबर रोजी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी आशा रोहित सुर्ववंशी हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हेशोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आशा सूर्यवंशी हिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिच्याकडून 10 ग्रॅम सोन्याची लगड, चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख असा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसर्या प्रकरणात, संजय घोरपडे यांच्या घरातील सोफ्यामध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे डोरले आणि टॉप्स चोरीला गेल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणात भूषण सुनील शिंपी याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता.
गुन्हेशोध पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला. त्याच्याकडून 18 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे. दोन्ही प्रकरणांत एकूण चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी आणि पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या सूचनेनुसार गुन्हेशोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, उल्हास गांगुर्डे, सुभाष ठुबे, पोलीस शिपाई सागर जाधव, मधुकर राव, शिवाजी मुंजाळ, समाधान शिंदे, संजय सपकाळे, मयूर पवार, अनिल गाढवे, फरीद इनामदार, गणेश कोठुळे, तुषार मते, प्रवीण राठोड आणि वैभव एखंडे यांनी केली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश देसले करीत आहेत.
Two cases of housebreaking and theft solved; stolen property recovered.