गर्भपात घडवून आणल्याचा आरोप
सिडको : प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ती गर्भवती झाल्यानंतर तीन वेळा गर्भपात घडवून आणला तसेच गर्भवती असताना तिला मारहाण करून पोटात लाथ मारल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धनंजय ऊर्फ सोनू जयद्रथ काकडे याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, धनंजय काकडे याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत संबंध ठेवले. तसेच दोघांमध्ये ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’चा करारनामा करण्यात आला होता. या काळात महिला गर्भवती झाल्यानंतर तिचा तीन वेळा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच 23 सप्टेंबर 2026 रोजी महिला गर्भवती असताना धनंजय काकडे याने तिला चारचाकी वाहनातून नांदूर नाकामार्गे विंचूरच्या दिशेने नेले. एका लॉन्सजवळ वाहन थांबवून तिला खाली उतरवले आणि मारहाण केली. यावेळी पोटातील गर्भाला इजा करण्याच्या उद्देशाने पोटात लाथ मारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय आपल्याविरुद्ध असलेले पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने फिर्यादीचा ओप्पो कंपनीचा मोबाइल फोन फोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीवरून धनंजय ऊर्फ सोनू जयद्रथ काकडे, हर्षद सुरवडे, अमन, मोनिका जयद्रथ काकडे आणि दंगल ऊर्फ कनिश्क काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकडे आणि पोलीस उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.
Sexual assault under the pretext of marriage