विद्यार्थ्यांना अडवून मारहाण; पैसे हिसकावले

जबरी चोरीचा गुन्हा 24 तासांत उघड; चेंबूरमधून तरुणाला अटक

सिडको : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना अडवून त्यांना मारहाण करत रोख रक्कम तसेच फोन-पेच्या माध्यमातून पैसे बळजबरीने हस्तांतरित करून घेणार्‍या तरुणाला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-2 ने मुंबईतील चेंबूर येथून अटक केली. प्रबल संतोष नाडे (वय 24, रा. नागसेनवाडी, वडाळानाका, नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इटिंगा कार आणि मोबाइल असा सुमारे सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 3 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास शालिमार-सीबीएस परिसरात विद्यार्थ्यांचा रिक्षाने प्रवास सुरू असताना दोन जणांनी इटिंगा कार रिक्षासमोर आडवी लावली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच फोन-पेच्या माध्यमातून ऑनलाइन पैसे बळजबरीने हस्तांतरित करून घेतले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले होते.
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान हा गुन्हा नागसेनवाडी परिसरातील प्रबल नाडे आणि त्याच्या साथीदाराने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
प्रबल नाडे हा मुंबईतील चेंबूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेत असताना सायन-ट्रॉम्बे रोडवरील डोगीनोज पिझ्झाजवळ तो इटिंगा कारसह असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने एका विधिसंघर्षित बालकाच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एमएच 47- बीवाय 7562 क्रमांकाची इटिंगा कार आणि मोबाइल असा एकूण सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने ही कारवाई केली.

Students intercepted and beaten up; money snatched.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *