सावळघाट अपघातात एक ठार, सात जखमी

दिंडोरी : प्रतिनिधी
नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गा वरील सावळघाटात शिर्डीहून राजकोटकडे जाणारी खासगी बस पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला असून, सात जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि. 6) रात्री अकराच्या सुमारास घडला.
चौधरी ट्रॅव्हल्सची खासगी बस (एआर 20-एफ 5252) एकूण 22 प्रवासी घेऊन शिर्डीहून राजकोटच्या दिशेने जात होती. सावळघाटातील एका अवघड वळणावर धुक्यामुळे निर्माण झालेल्या कमी दृश्यमानतेमुळे बसचालकाचा अंदाज चुकला आणि बस पलटी झाली. या अपघातात महेंद्र पाल हे प्रवासी जागीच ठार झाले.
जखमी प्रवाशांची नावे ः प्रमिला राऊत, यश देसाई, आरती देसाई, बालविमल जगदीश, नयन वासोने, स्वाती भदाणे आणि सुरेश भदाणे. अपघाताची माहिती मिळताच ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय नाशिक, नामको चॅरिटेबल ट्रस्ट आणि आडगाव नाक्यावरून तातडीने 4 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिकांच्या मदतीने बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमींवर सुरुवातीला उमराळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनास्थळी त्र्यंबकेश्वर व पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि दोन पोलीस निरीक्षक तत्काळ दाखल झाले होते. हरेशभाई वजुभाई घाडिया (रा. मावडी, ता. जि. राजकोट, गुजरात) यांच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास वाळके, पवार, मोकळ, भोईर, ब्राह्मणे व प्रकाश गायकवाड तपास करीत आहेत.

One killed, seven injured in Savalghat accident.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *