जुहूतील पुष्पा पार्क येथे वर्दळीत थरार, अभिनेता सुरक्षित
मुंबई : प्रतिनिधी
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर रविवारी संध्याकाळी 7 ते 7.30 च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील जुहू येथील पुष्पा पार्क, जमुनाबाई नर्सरी स्कूल प्लेग्राउंडजवळ वर्दळीच्या भागात ही घटना घडली. श्रॉफ सुरक्षित असून बिश्नोई गँगने हल्ल्याची अफवा असली तरी पोलिसांनी त्याची पुष्टी केलेली नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टायगर श्रॉफ फुटबॉल खेळण्यासाठी पुष्पा पार्क येथे गेला होता. तो आपल्या कारजवळ असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर 7 ते 8 राऊंड गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पसार झाले. या गोळीबारात कारची काच फुटली. सुरुवातीला टायगर जखमी झाल्याची अफवा पसरली होती, पण मुंबई पोलिसांनी नंतर स्पष्ट केले की, -टायगर श्रॉफ सुरक्षित आहे, त्याला गोळी लागलेली नाही. काचेचे तुकडे लागल्याने किरकोळ जखम झाली असल्याचे काही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या हल्ल्यात टायगरचा कारचालक आणि जवळ उभा असलेला एक ऑटो रिक्षा चालक जखमी झाला आहे. दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाच्या हाताला गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी?
या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतल्याचा एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. गँगस्टर अनिल पंडितच्या नावाने ही पोस्ट आल्याचे म्हटले जात आहे, मात्र याची अधिकृत पुष्टी मुंबई पोलिसांनी केलेली नाही. पोलीस सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. याआधी सलमान खानच्या घरावर गोळीबार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर आता टायगर श्रॉफवरील हल्ल्याने बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मुंबईत कायदा-सुव्यवस्था राहिली आहे का? असा सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे.
Shots fired at Tiger Shroff’s car