– प्रशांत पोतदार
क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा विचारही करवत नाही ना?
परंतु असा विचार मनात येण्याचं कारण होतं एक चर्चा. एक सकारात्मक आणि हेल्दी चर्चा!
ओझर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख सर, टाऊन प्लॅनर ऐश्वर्या वैरागर मॅडम आणि मी जेवणाच्या वेळेत गप्पा मारत असताना व्यायाम, बदलती जीवनशैली आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी या विषयांवर सहज चर्चा सुरू झाली. किरण देशमुख सर हे उत्तम कार्यालयप्रमुख असण्याबरोबरच संपूर्ण कार्यालयाला कुटुंबाप्रमाणे जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्येक कर्मचार्याशी जिव्हाळ्याने संवाद साधताना त्यांच्या बोलण्यात आरोग्य, व्यायाम आणि कुटुंबाप्रति असलेल्या जबाबदारीचे महत्त्व जाणवते. त्यांच्या या पैलूंविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर चर्चा करूच, पण या चर्चेतून मनात ठसलेला विचार प्रत्येकाने समजून घेण्यासारखा आहे.
कुटुंबातील प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो. त्यात कुटुंबप्रमुख हा अनेकदा संपूर्ण कुटुंबाचा कणा आणि आधार असतो. मुलांच्या शिक्षणापासून भविष्यापर्यंत, आर्थिक नियोजनापासून घरातील सुख-दुःखापर्यंत अनेक जबाबदार्या तो पार पाडत असतो. मुलाला डॉक्टर व्हायचे असते, कुणाला आयआयटीमध्ये प्रवेश घेऊन इंजिनिअर व्हायचे असते, तर कुणाला उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करायचे असते. या स्वप्नांमागे मुलांची मेहनत असतेच, पण त्यांना बळ देणारा कुटुंबाचाही मोठा वाटा असतो.
कुटुंबासाठी झटणारा माणूस अनेकदा स्वतःच्या गरजा शेवटी ठेवतो. दिवसभराची धावपळ, कार्यालयीन जबाबदार्या आणि घरातील कामे यांत स्वतःसाठी वेळ काढणे कठीण वाटते. माझं काय, मी ठीक आहे, असं म्हणत तो थकवा आणि आरोग्याच्या संकेतांकडे दुर्लक्ष करत राहतो.
क्षणभर आपल्या अनुपस्थितीची कल्पना केली, तर अनेक गणिते बदलू शकतात. मुलांच्या स्वप्नांची दिशा बदलू शकते, जबाबदार्यांचे ओझे वाढू शकते आणि कुटुंबाला नव्याने आयुष्याची घडी बसवावी लागू शकते. म्हणूनच आपल्या माणसांसाठी धावणार्या प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची जबाबदारीही ओळखायला हवी.
आपण मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करतो, पण त्या भविष्याचा आनंद घेण्यासाठी स्वतःला निरोगी ठेवण्याची तरतूद करतो का? घर बांधताना प्रत्येक वीट महत्त्वाची वाटते. मग ते घर उभे करणारा माणूस निरोगी राहावा, याचा विचार आपण का करत नाही?
आजच्या धकाधकीच्या जीवनात मोबाइलचा अतिवापर, बैठंकाम, अनियमित आहार, अपुरी झोप आणि मानसिक ताण यांचा आरोग्यावर परिणाम होत आहे. व्यायामासाठी वेळ नाही, असे आपण म्हणतो, पण मोबाइलवर सहज कितीतरी वेळ घालवतो. आज थकलोय, उद्यापासून व्यायाम सुरू करू, असे म्हणत आपण आरोग्याची काळजी पुढे ढकलत राहतो.
दैनंदिन जीवनात काही साधे बदल करूनही आरोग्याची सुरुवात करता येते. जवळच्या अंतरासाठी चालत जाणे, कामाच्या वेळेत अधूनमधून उठून चालणे, जेवताना मोबाइल बाजूला ठेवणे आणि रात्री वेळेवर झोपणे अशा छोट्या सवयी उपयुक्त ठरतात. आरोग्यासाठी मोठ्या साधनांपेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे असते.
व्यायाम म्हणजे केवळ शरीरयष्टी कमावणे नव्हे. शरीर सक्रिय राहावे आणि दैनंदिन कामे उत्साहाने करता यावीत, यासाठीही व्यायाम आवश्यक आहे. नियमित चालणे, योगासने किंवा प्रकृतीनुसार शारीरिक हालचाली केल्याने हृदयाचे आरोग्य जपण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होते. त्यासोबत संतुलित आहार, पुरेशी झोप, आवश्यक आरोग्य तपासण्या आणि मानसिक स्वास्थ्य यांनाही महत्त्व आहे. व्यायामाची सुरुवात आपल्या क्षमतेनुसार हळूहळू करावी; आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आपण वाहनाची देखभाल करतो, घरातील वस्तू जपतो आणि आर्थिक भविष्याचे नियोजन करतो. मग हे सर्व करणार्या आपल्या शरीरासाठी वेळ का काढू नये? व्यायामासाठी दिलेला अर्धा तास हा कुटुंबापासून हिरावून घेतलेला वेळ नसतो, तर कुटुंबासोबत निरोगीपणे जगण्यासाठी केलेली गुंतवणूक असते.
ही जबाबदारी केवळ कुटुंबप्रमुखाची नाही. घरातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाशी जोडलेले असते. एकत्र चालणे, आरोग्यदायी आहार घेणे आणि एकमेकांना चांगल्या सवयींसाठी प्रोत्साहन देणे यामुळे आरोग्याबरोबरच नात्यांमधील जवळीकही वाढते.
शेवटी, आपण आपल्या माणसांसाठी जगतो, त्यांच्या स्वप्नांसाठी धडपडतो आणि त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधतो. मग त्या आनंदाचा भाग होण्यासाठी
स्वतःला निरोगी ठेवणे हे आपले कर्तव्य नाही का?
पुन्हा एकदा स्वतःला प्रश्न विचारूया
मीच जर नसेल तर?
माझ्या माणसांच्या स्वप्नांना बळ कोण देणार? त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मीच निरोगी नसेन, तर आयुष्यात मिळवलेल्या यशाचा आनंद तरी कसा घेणार? म्हणून आजपासून
स्वतःसाठी थोडा वेळ काढूया. मोबाइलचा अनावश्यक वापर कमी करूया, आहार आणि झोपेच्या सवयी सुधारूया आणि व्यायामाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया. मोठे बदल एका दिवसात घडत नाहीत, पण रोज केलेली छोटी कृती आयुष्याला मोठी दिशा देऊ शकते.
आपल्या माणसांसाठी आपण निरोगी असणे हीदेखील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. आपल्या उपस्थितीची किंमत आपल्या माणसांना आपल्या अनुपस्थितीनंतर जाणवण्याची वेळ येऊ नये, यासाठी आजच स्वतःला जपूया.
आपण आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर धावत राहतो, पण आपल्या माणसांसोबत निरोगीपणे जगता यावे, यासाठी स्वतःला जपणे हीच आपल्या कुटुंबाप्रति असलेल्या प्रेमाची खरी जाणीव आहे!
What if I am not there?