रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर

चांदवड : वार्ताहर
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी बुधवारी (दि. 21) दुपारी आयशर टेम्पोने पुढे जाणार्‍या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण
अपघात झाला.
या अपघातात आयशर चालक देवीदास कापसे (वय 35, रा. मोसम पूल, मालेगाव) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. अपघातानंतर चालक केबिनमध्ये अडकल्याने जेसीबीच्या सहाय्याने त्यांची सुटका करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (क्र. एमएच 04 ईबी 3858) नाशिकहून मालेगावच्या दिशेने जात होता. बुधवारी दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास श्री रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी पोहोचला असता, पुढे जाणार्‍या ट्रकला आयशरची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, आयशरच्या केबिनचे नुकसान झाले आणि चालक देवीदास कापसे केबिनमध्ये अडकून पडले. त्यांच्या डोक्याला तसेच दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.

जेसीबीच्या सहाय्याने चालकाची सुटका

अपघाताची माहिती मिळताच चांदवड टोलप्लाझाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. केबिनमध्ये अडकलेल्या जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर चालकाची सुटका करून त्यांना तातडीने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मालेगाव येथे हलविण्यात आले.

महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत

या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

 

Eicher truck rams into another truck at the base of Renukadevi Ghat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *