– योगिनी पैठणकर
आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे, अडगळ, पिशव्या, नको असलेले कपडे, पुस्तकं, पेन, डायर्या हॉलमध्ये येतात आणि आवराआवरीला सुरुवात होते! त्यात मग भांडे, कपडे, वह्या, जुन्या कप बशा, डिश सगळेच येतात! भिंतीवरची जाळं नाहीशी होतात. झाडांची- कुंड्यांची जागा बदलते, पडदे बदलतात. त्यामुळे नको असलेले कपडे गंगेवर नेऊन दिले जातात! दिवाणखाना खरंच लख्ख होतो…
कधीकधी आपण नव्याने, आवडीने घेतलेल्या वस्तू दोन-तीन वर्षे वापरल्याच जात नाहीत! हे नेमकं नंतर घर आवरताना कधीतरी लक्षात येतं की, अरे हे उगाचच घेतलंय, त्यात रांगोळीचा पेन, फ्राय पॅन, डीशेस, कपबशा, चमचे सगळंच असतं आणि मग हे फेकताना वाईट वाटत राहातं. तसंच कपड्यांचे प्रत्येक वेळेस हा छानेय, हा ट्रेंडिंग आहे. नवीन नवीन घेतले जातात. घरात ठेवलेल्या कपाटात मावेना झालेत, पण तरी काही ऑनलाइन दिसलं की मागव. आता तर कपाटं कमी आणि त्यातल्या वस्तू जास्त असं होऊन गेलंय! तसंच कपबशांचही. दोन पिढ्यांना पुरेल एवढे कप आणि एवढ्या रंगाचे प्रकार आता माझ्या घरात आहे …तरीपण जलारामकडे गेले की एखाद्या प्रकारचे सेट, कपबशा आवडतातच आणि स्त्रीचं मन तिकडे रमतच. हे माझंच नाही, अनेक गृहिणींचही असेल. तसेच काही नवीन वस्तू, चिमटे, पेले, बाटल्या, वाट्या. मग परत या पसारात भर पडते! असंच पुस्तकांचंपण आहे. माझ्या नवर्याला आणि मला लायब्ररीची हौस. मग दोन कपाटं भरून पुस्तकं होतील अशी आमची आहेत. त्यात बाबांनी लिहिलेली, माझी स्वतःची, शाळेतली असंख्य जमा होतात! तेव्हा वाटायचं एखादी लायब्ररी असावी. आता त्यातलं एकही पान वाचल जात नाही किंवा नंतर ती आवरली ही जात नाही.. उरतो तो फक्त पसाराच! किती नि कसा आवरावा हा आता मोठा प्रश्न आहे… दोन वर्षांपूर्वी या आवराआवरीमुळेच मी आजारी पडून अॅॅडमिट झालेले! आता मात्र काहीच करू नये, काहीच आणू नये, काही बघायलासुद्धा जाऊ नये, असं वाटायला लागलंय. एखादी गोष्ट एकदाच वापरतो नि आणण्यासाठी तासन्तास घालवतो. एकंदरीत काय तसं तर जीवनावश्यक सामान घरात खूप आहे आणि जागा मात्र तेवढीच आहे ना! लागेल त्या गोष्टी मनात आणि जागेत साठवणं आता शक्य नाही! ते फेकणही शक्य नाही! कठीण जाते ते सगळं जमवलेलं फेकताना! मन जड झाले जेव्हा परवा नाना पाटेकरांचा अचानक मृत्यू बघताना हृदय आणि मन हळवं झालं आणि विचार केला आपण किती साठवतो! खरंतर मरताना हे सगळं इथेच ठेवून जायचं असतं… त्या क्षणाला परत कधीच न बघण्यासाठी, न घेण्यासाठी, पण तरी आपण वस्तू संचय करत जातो, करत जातो आणि एक दिवस हे सगळं अडचणीत किंवा आवरावरीत फेकलं जात़ं… अगदी आपल्या आठवणींसारखंच डिलिट, क्लीअर लहरींसारखंच, कायमचं!
The hustle and bustle of Diwali