राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील 500 कोटी रुपयांचा वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. पुरावे द्या, या शिंदे यांच्या आव्हानानंतर जरांगे यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषद घेऊन कथित ऑडिओ क्लिप सादर केली. दरम्यान, या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी भाजपकडूनच एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
जरांगे यांनी काल पत्रकार परिषदेत ही ऑडिओ क्लिप ऐकवली. जरांगे यांच्या दाव्यानुसार, ही क्लिप 2024 विधानसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या भाजपच्या एका झूम कॉन्फरन्स मीटिंगची आहे. क्लिपमध्ये एका महिला आवाजात हिंदीत ऐकू येते की, मनोज जरांगे पाटील यांना आधीच 500 कोटी पोहोचले आहेत आणि हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पोहोचवले गेले आहेत.
जरांगे हा भाजपला मराठाद्रोही दाखवतोय. त्याला वेळीच आवरले नाही तर तो मराठवाड्यात तुम्हाला गिळून टाकेल. त्याला डॅमेज करायलाच हवे. पक्ष निधीतून नाही तर वैयक्तिक खर्च करूनही त्याला रोखा, अशी चर्चा क्लिपमध्ये ऐकू येते. जरांगे यांच्या विरोधात बोलण्यासाठी उदयनराजे भोसले, प्रवीण दरेकर, नितेश राणे, निरंजन डावखरे यांसारख्या मराठा नेत्यांना पुढे करण्याबाबतही चर्चा झाल्याचा दावा जरांगे यांनी केला.
गेल्या तीन वर्षांपासून उपोषण काळात, निवडणूक काळात मला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे गरीब मराठ्यांच्या आंदोलनाला संपवण्याचे कारस्थान आहे. याची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली.
शिंदे सेनेचा पलटवार : बोलणारे भाजपचेच लोक
शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांना प्रत्युत्तर दिले. ही क्लिप दोन-अडीच वर्षांपूर्वीची आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा ती बाहेर का नाही आली? आणि महत्त्वाचे म्हणजे क्लिपमध्ये बोलणारे जे तीन-चार लोक आहेत, ते भाजपचेच आहेत, यात दुमत नाही. कॉन्फरन्स कॉलवर कुणीही हजार-पाचशे कोटींची भाषा करू शकतो. त्याला शेंडा ना बुडखा नाही. एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे, असे कदम म्हणाले.
ती हिंदी बोलणारी महिला कोण आहे? तिच्याकडे 500 कोटी कुठून आले? तिचा शोध घेऊन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
शिंदे गट-भाजपमध्येच जुंपली!
या मुद्द्यावरून आता शिंदे गट आणि भाजपमध्येच जुंपली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी केली आहे. क्लिपमधील मंडळी भाजपच्या मीडिया टीममधील असल्याचेही सामंत म्हणाले. रामदास कदम यांनीही क्लिपमधील सर्व मंडळी भाजपशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी हा एकनाथ शिंदेंच्या बदनामीचा कट असल्याचा आरोप केला. संजय लाखे-पाटील यांनीही, शिंदे हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याने जरांगे कुणाच्या तरी इशार्यावरून हे सारे करत असल्याचे म्हटले आहे.
शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार राहुल पाटील, खासदार रवींद्र वायकर, दीपक सावंत उपस्थित होते. शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या नावांचा उल्लेख येतो, त्यांच्या भूमिका तपासाव्यात, असे निवेदन दिल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा शब्द दिल्याचे सेना नेत्यांनी सांगितले.
सचिन अहिर म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्याचे काम केले आहे. मनोज जरांगे यांनी नाहक आणि ज्याला काही अर्थ नाही असा आरोप केला. मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपाचे खंडन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कोणाची गय केली जाणार नाही, असे म्हटले, असे सचिन अहिर म्हणाले. राहुल शेवाळे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे वक्तव्य केले ते निंदनीय आणि बदनामीकारक आहे. म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो. या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविषयी केलेली कथित वक्तव्य आक्षेपार्ह आणि बदनामीकारक आहेत, अशी मागणी केल्याचे राहुल शेवाळे म्हणाले.
Jarange’s audio ‘bomb’