पिंजर्यातील ‘गुड्डू’ कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीत हालचाली कैद
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
चेहेडी बुद्रुक येथील म्हस्के मळा परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, मंगळवारी (दि. 27) पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने पिंजर्यात बंद असलेल्या ‘गुड्डू’ नामक कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्रा पिंजर्यात सुरक्षित असल्याने त्याचा जीव वाचला. बिबट्याच्या या हालचाली बंगल्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चेहेडी बुद्रुक, म्हस्के मळा आणि चाडेगाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. 29 ऑगस्ट रोजी चाडेगाव परिसरातील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर पोहोचलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी शिवाजीराव व श्यामराव म्हस्के यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या कुत्र्यावरही बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही कुत्रा पिंजर्यात असल्याने त्याचा जीव वाचला होता. आता पुन्हा त्याच परिसरात बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. मंगळवारी पहाटे बिबट्याने म्हस्के यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या पिंजर्याकडे धाव घेत त्यातील ‘गुड्डू’ कुत्र्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला.
कुत्र्याने आवाज केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून परिसरात पिंजरे लावण्यात येत आहेत. मात्र, पिंजर्यात भक्ष्यच नसेल तर बिबट्या त्याकडे आकर्षित कसा होणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
बिबट्याला पिंजर्यात पकडण्यासाठी शेळी किंवा अन्य योग्य भक्ष्य ठेवण्याची आवश्यकता असते.
मात्र, भक्ष्याची व्यवस्था नेमकी कोणी करायची, त्यासाठीचा खर्च कोण उचलणार आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कधी होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
परिसरात बिबट्याचा वारंवार होणारा वावर आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांचे वाढते प्रयत्न पाहता, वन विभागाने केवळ पिंजरे लावण्यापुरती कारवाई न करता बिबट्याला पकडण्यासाठी ठोस नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Leopard terror continues in Chehedi Budruk