सातपूरमध्ये तरुणासह 8 ते 10 जणांचा धुडगूस

टेम्पोची काच फोडून दहशत

सिडको : प्रतिनिधी
मित्रासोबत राहू नको, या कारणावरून कुरापत काढत एका तरुणासह आठ ते दहा जणांनी श्रमिकनगर परिसरात धुडगूस घातल्याची घटना घडली. शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत दगडफेक करण्यात आली. यात टाटा अल्ट्रा टेम्पोची समोरील काच फोडून नुकसान करण्यात आले. नागरिकांना दगड मारण्याच्या धमक्या देत दहशत निर्माण केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल बाबूलाल बुंदे (वय 26, रा. आनंद हाइट्स, कडे पठार चौक, श्रमिकनगर, सातपूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. राहुल शेवरे (वय 18, रा. गोपाल अपार्टमेंट, श्रमिकनगर) आणि त्याच्यासोबत असलेले आठ ते दहा अनोळखी तरुण आनंद हाइट्स परिसरात आले.
आर्यन किरण जगताप याला राहुल शेवरेसोबत राहू नको, या कारणावरून संशयितांनी फिर्यादीशी वाद घातला. त्यानंतर जमाव जमवून शिवीगाळ व धमकी देत जिवे मारण्याच्या उद्देशाने
दगडफेक केल्याचा आरोप आहे. या दगडफेकीत राहुल रघुनाथ बच्छाव यांच्या मालकीच्या टाटा अल्ट्रा टेम्पोची (एमएच 15- जीव्ही 4299) समोरील काच
फुटून नुकसान झाले. या घटनेनंतर संशयितांनी ‘मी राहुल शेवरे तुमचा बाप आहे,’ असे म्हणत दगड उचलून फिर्यादी व नागरिकांच्या दिशेने हातवारे केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी भीतीपोटी अनेक जण घाबरून पळून गेले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांविरुद्ध सातपूर पोलीस तपास करीत आहेत.

8 to 10 people including a youth were beaten up in Satpur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *