शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात
पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व खिडकी तोडून चोरट्यांनी 1 लाख 50 हजार 800 रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना 26 ऑक्टोबरला उघडकीस आली. शेजार्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना तातडीने माहिती मिळाल्याने दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
विनोद रामराव देशमाने यांचे कुटुंब बाहेरगावी असताना चोरट्यांनी त्यांच्या दोन मजली बंगल्याला लक्ष्य केले. घरातील कपाटे फोडून रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा 1,50,800 रुपयांचा ऐवज चोरण्यात आला. देशमाने यांच्या घरातून संशयास्पद हालचाली आणि देवघराची जाड काच फुटल्याचा आवाज आल्याने शेजार्यांना शंका आली. त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखत पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भारत सुरेश मोगल व रोशन ऊर्फ राजेंद्र भास्कर मोरे या दोन संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या भारत मोगल याची राजकीय पार्श्वभूमी असल्याची आणि स्थानिक नगरपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव बसवंत पोलीस करत असून, नागरिकांनी घराबाहेर जाताना सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
House broken into in Pimpalgaon; valuables worth 1.5 lakh rupees stolen