भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास
येवला : प्रतिनिधी
शहरातील पारेगाव रोड परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारत दानपेटीतील रोकड आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेल्याची घटना घडली आहे. देवाच्या मंदिरातच चोरी झाल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, शहरात सातत्याने होणार्या चोर्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी फोडून त्यातील अंदाजे 50 हजार रुपयांची रोकड लांबवली. विशेष म्हणजे, पोलिसांना तपासात पुरावा मिळू नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांचा डीव्हीआरदेखील आपल्यासोबत नेला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. येवला शहर व उपनगरांमध्ये सध्या चोर्यांचे सत्र वाढले असून, चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी आणि लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक व भाविकांकडून होत आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Thieves strike at Swami Samarth Kendra in Yeola