धनत्रयोदशीच्या तोंडावर सोने-चांदीला झळाळी

सोने तोळ्यामागे 6650 रुपयांनी महागले; चांदीत किलोमागे दहा हजारांची वाढ

नाशिक : प्रतिनिधी
धनत्रयोदशीच्या तोंडावर झालेल्या भाववाढीमुळे सोने-चांदीला चांगलीच झळाळी प्राप्त झाली. अवघ्या चार दिवसांत नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने दहा ग्रॅममागे 6 हजार 650 रुपयांनी, तर 22 कॅरेट सोने 5 हजार 600 रुपयांनी महागले आहे. चांदीच्या दरातही किलोमागे तब्बल दहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी (दि. 5) नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 46 हजार 50 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 33 हजार 380 रुपयांवर पोहोचला. चांदीनेही दोन लाख दहा हजार रुपयांचा टप्पा गाठला
आहे.
गेल्या चार दिवसांतील दरांचा आढावा घेतल्यास सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. सोमवारी (दि. 2) 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 39 हजार 400 रुपये होता. मंगळवारी तो 1 लाख 39 हजार 670, बुधवारी 1 लाख 42 हजार 830, तर गुरुवारी 1 लाख 46 हजार 50 रुपयांवर पोहोचला. विशेष म्हणजे, बुधवारी आणि गुरुवारी मिळूनच सोन्याच्या दरात 6 हजार 380 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोन्याचा भावही सोमवारी 1 लाख 27 हजार 780 रुपयांवरून गुरुवारी 1 लाख 33 हजार 380 रुपयांवर पोहोचला.चांदीच्या दरातही गुरुवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. सोमवारपासून बुधवारपर्यंत चांदीचा भाव किलोमागे दोन लाख रुपयांवर स्थिर होता. मात्र, गुरुवारी त्यात एकाच दिवसात दहा हजार रुपयांची वाढ होऊन भाव दोन लाख दहा हजार रुपयांवर पोहोचला. त्यामुळे सोन्याबरोबरच चांदीची नाणी, भांडी आणि पूजेच्या वस्तूंची खरेदीही महागली आहे.धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे नाशिकमधील सराफ बाजार, नाशिकरोडसह शहरातील विविध सराफी पेढ्यांमध्ये या मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. मात्र, यंदा ऐन खरेदीच्या मुहूर्तावर दर वाढल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. विशेषतः लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणार्‍या कुटुंबांना वाढीव खर्चाचा भार सहन करावा लागणार आहे. दरम्यान, जागतिक बाजारातील घडामोडी, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मिळणारी पसंती आणि सणासुदीच्या काळातील मागणी यांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होत आहे. राजधानी दिल्लीतही गुरुवारी सोन्याचा भाव दहा ग्रॅममागे 1 लाख 48 हजार 800 रुपयांवर पोहोचला.

Gold and silver shine ahead of Dhantrayodashi

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *