सिडको : प्रतिनिधी
मालमत्तेच्या मूळ मालकाच्या नावाने बनावट व्यक्ती उभी करून तसेच बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि अन्य कागदपत्रांच्या आधारे पाथर्डी शिवारातील 360 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील वघई येथील रहिवासी सतीश प्रकाश जगताप (वय 63, व्यवसाय हॉटेल व्यावसायिक) यांच्या मालकीचा नाशिक महानगरपालिका हद्दीतील पाथर्डी शिवारात सर्व्हे क्रमांक 243/1/2/3 मधील प्लॉट क्रमांक 52 हा 360 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे.
संशयितांनी संगनमत करून या भूखंडाची परस्पर विक्री करण्याचा कट रचला. त्यानुसार नाशिक येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक 11031/2026 अन्वये विक्रीखताची नोंदणी करण्यात आली. यावेळी सतीश प्रकाश जगताप यांचे नाव धारण करणार्या एका बनावट व्यक्तीला मालक म्हणून उभे करण्यात आले.
त्यासाठी मूळ मालकाच्या नावाचे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि अन्य कागदपत्रे तयार करण्यात आली. तसेच बनावट सह्या आणि अंगठे करून मूळ मालकाची कोणतीही संमती किंवा परवानगी नसताना भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सुधीर तुळशीराम लोणारी (रा. पाथर्डी फाटा, नाशिक), सादिक मोहम्मद हनीफ पठाण (रा. मारुती चेंबर, जिल्हा न्यायालय आवार, नाशिक), सतीश प्रकाश जगताप हे नाव धारण करणारा बनावट इसम आणि त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mutual sale of plots based on fake Aadhaar card, PAN card