मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दोन तासांत उघड

घोटी पोलिसांची कामगिरी : दुचाकी जप्त, संशयिताला अटक

घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील दागिने जबरीने चोरून नेल्याच्या घटनेत घोटी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत धडक कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली असून, घोटी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी सुमारे 11.20 वाजेच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील 70 वर्षीय हिराबाई कोकणे या मुंबई-आग्रा महामार्गावरून आडवणच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने बळजबरीने हिसकावून पोबारा केला. या चोरीत सुमारे 37 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच संबंधित महिलेने डायल 112 वर संपर्क साधला. यानंतर घोटी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस पथकाने अवघ्या दोन तासांत संशयित आरोपी संकेत कैलास चंद्रमोरे (वय 18, रा. बितुरली, ता. इगतपुरी) याला ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही (एमएच 15 केपी 9794) जप्त केली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रतीक भिंगारदे, पोलीस अंमलदार परीक्षित इगळे, सागर सौदागर, सुनील पाटील, सनी भवर, संतोष नागरे तसेच गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश कासार यांच्या पथकाने केली.

तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा : शिंदे

घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतीही चोरी, जबरी चोरी अथवा संशयास्पद घटना घडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ डायल 112 किंवा घोटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिकांनी वेळेत माहिती दिल्यास पोलिसांना गुन्हेगारांचा माग काढणे आणि गुन्हे उघडकीस आणणे अधिक सोपे होते. पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पावधीत गुन्ह्याचा तपास लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Case of mangalsutra theft solved within two hours

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *