दिवाळी, छटपूजेसाठी रेल्वेच्या 82 हून अधिक विशेष गाड्या धावणार

नाशिकरोडसह प्रमुख स्थानकांवर सुरक्षाव्यवस्था कडक

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भुसावळ रेल्वे विभागाने सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी व्यापक तयारी केली आहे. नाशिकरोड, मनमाड, इगतपुरी, देवळालीसह विभागातील प्रमुख स्थानकांवर सुरक्षाव्यवस्था बळकट करण्याबरोबरच प्रवाशांसाठी विविध सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.
नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, अकोला आणि खंडवा या प्रमुख स्थानकांवर गर्दीचे नियोजन व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे अतिरिक्त जवान, तिकीट तपासनीस आणि वाणिज्य पर्यवेक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चोवीस तास ड्युटी लावण्यात आली आहे. सणासुदीच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन भुसावळ विभागातून 82 हून अधिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. यामध्ये मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, अमरावती-उधना, अमरावती-पुणे, मुंबई-गोरखपूर, मुंबई-दरभंगा, मुंबई-बनारस, पुणे-दानापूर आणि पुणे-गोरखपूर या गाड्यांचा
समावेश आहे.
स्थानकांवरील भोजन, जनता खाना, पॅकेज्ड खाद्यपदार्थ, पेये आणि बाटलीबंद पिण्याचे पाणी यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच स्वच्छतागृहे, प्रतीक्षालये आणि पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणांची नियमित स्वच्छता केली जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था, लिफ्ट, एस्केलेटर, बॅटरी कार आणि पंखे यांसारख्या सुविधाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. स्थानक परिसर आणि फलाटांवरील गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी नियंत्रण कक्षात कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय, विभागीय स्तरावर चोवीस तास कार्यरत असलेली वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण आणि गर्दीच्या परिस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळावा, हा या व्यवस्थेमागील उद्देश आहे.

नाशिकरोड स्थानकावर विशेष लक्ष

नाशिकरोड रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे 142 रेल्वेगाड्यांची ये-जा होते. पंजाब मेल, राज्यराणी, हावडा मेल, देवगिरी, गोदान, छपरा, गोरखपूर, शालिमार, सुलतानपूर, विदर्भ एक्स्प्रेस, सीतापूर आणि जयनगर एक्स्प्रेस या गाड्यांना सणासुदीच्या काळात मोठी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन स्थानकावरील फलाट, प्रवेशद्वार आणि प्रवाशांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना

फलाटांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी अतिरिक्त अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले असून, उद्घोषणा प्रणालीद्वारे गाड्यांचे आगमन, प्रस्थान, सद्यस्थिती आणि फलाट क्रमांक याबाबत नियमित घोषणा केल्या जात आहेत. गाड्यांचे फलाट आधीच निश्चित करून ऐनवेळी बदल टाळण्याची दक्षता घेतली जात आहे.

Over 82 special trains to run for Diwali and Chhath Puja

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *