‘धरती आबा’ बिरसा मुंडा

अन्यायाविरुद्ध पेटलेला स्वाभिमानाचा अग्निकुंड!

– ग्रीष्मा नागमोती

ज्या भूमीवर पिढ्यान्पिढ्या वास्तव्य केले, ज्या जंगलांनी जगण्याचा आधार दिला, ज्या जमिनीवर घाम गाळून उदरनिर्वाह केला, त्याच जल, जंगल आणि जमिनीवरील हक्क हिरावले जाऊ लागले, तर? अन्याय सहन करण्यालाही मर्यादा असते. अशाच अन्यायाविरुद्ध छोटा नागपूरच्या जंगलातून एक आवाज घुमला… ‘अबुआ दिशुम, अबुआ राज!’ म्हणजेच ‘आपला देश, आपले राज्य!’ हा आवाज होता अवघ्या विशीतल्या बिरसा मुंडा यांचा! ब्रिटिश सत्तेच्या शोषणाविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित करणार्‍या या तरुणाने केवळ बंड पुकारले नाही, तर स्वाभिमानाची अशी ज्योत पेटवली, जी आजही तेवत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासींच्या योगदानाचा हा तेजस्वी अध्याय आहे. अवघ्या 24 वर्षांच्या आयुष्यात इतिहास घडविणार्‍या या क्रांतिनायकाची जयंती, 15 नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
सध्याच्या झारखंडमधील उलीहातू या छोट्याशा गावात 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगना मुंडा आणि करमी हातू यांच्या पोटी बिरसा यांचा जन्म झाला. तत्कालीन बंगाल प्रांताचा भाग असलेल्या या परिसरात त्यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले. मुंडा समाजाचे जीवन निसर्गाशी एकरूप झालेले होते. स्वतःची भाषा, संस्कृती, परंपरा आणि सामूहिक शेतीची पद्धत असलेला हा समाज जंगलाला केवळ उपजीविकेचे साधन नव्हे, तर आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग मानत होता. मात्र, ब्रिटिशकालीन महसूल धोरणे, जमीनदार, सावकार आणि मध्यस्थांच्या वाढत्या वर्चस्वामुळे छोटा नागपूर परिसरातील आदिवासींच्या पारंपरिक ‘खुंटकट्टी’ जमीनहक्कांवर गदा आली. वाढते कर, कर्जबाजारीपणा, जमिनींची जप्ती आणि वेठबिगारीच्या जोखडात आदिवासी समाज भरडला जाऊ लागला. पिढ्यान्पिढ्या कसलेल्या जमिनीवरच परकेपणाची वेळ आली. जंगलातील संसाधनांवरही निर्बंध लादले गेले. ज्यांच्या जगण्याचा आधारच हिरावला जात होता, त्यांच्यासमोर अन्याय सहन करण्याखेरीज पर्याय उरला नव्हता. अशा परिस्थितीत बिरसा यांच्या मनात प्रतिकाराची ठिणगी पडली आणि पुढे त्याचेच रूपांतर एका व्यापक संघर्षात झाले.
चाईबासा येथील मिशनरी शाळेत शिकताना बिरसा यांचा पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीशी आणि धार्मिक विचारांशी परिचय झाला. मात्र, त्याच काळात आपल्या समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मितेविषयीची त्यांची जाणीव अधिक तीव्र होत गेली. आपल्या लोकांची दुरवस्था केवळ परकीय शोषणामुळेच नव्हे, तर समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अनिष्ट प्रथांमुळेही वाढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणूनच बिरसा मुंडा यांचा लढा केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्ध नव्हता; तो समाजाच्या अंतर्गत परिवर्तनाचाही होता. त्यांनी ‘बिरसाइत’ या धार्मिक-सामाजिक पंथाची स्थापना करून स्वच्छता, शिस्त, व्यसनमुक्ती आणि सदाचाराचा संदेश दिला.
दारू, अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांचा त्याग करण्याचे आवाहन केले. निसर्गाविषयी आदर, सत्याचे आचरण आणि समाजातील एकतेला त्यांनी महत्त्व दिले. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन असंख्य आदिवासी त्यांच्याभोवती एकवटू लागले. लोक त्यांना ‘भगवान बिरसा’ आणि ‘धरती आबा’ म्हणजेच धरतीचे पिता म्हणून संबोधू लागले.
मात्र, केवळ समाजप्रबोधन करून अन्यायाची व्यवस्था बदलणार नव्हती. त्यासाठी संघटित संघर्ष आवश्यक होता. याच जाणिवेतून 1899-1900 या काळात बिरसा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध ‘उलगुलान’चे रणशिंग फुंकले. ‘उलगुलान’ म्हणजे महाबंड, मोठी उलथापालथ! ‘अबुआ दिशुम, अबुआ राज’ ही घोषणा आदिवासींच्या स्वाभिमानाचा हुंकार बनली. आपल्या भूमीवर आपलाच अधिकार असला पाहिजे, आपल्या जीवनाचा निर्णय आपणच घेतला पाहिजे, ही त्या घोषणेमागची भावना होती. जल, जंगल आणि जमिनीवरील पारंपरिक हक्क पुन्हा मिळवणे आणि शोषणकारी ब्रिटिश व्यवस्था संपवणे, हे या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
बिरसा यांच्या हाकेला हजारो आदिवासी स्त्री-पुरुषांनी प्रतिसाद दिला. खुंटी, तामार, बसिया आणि रांची परिसरात उठावाचे लोण पसरले. हातात पारंपरिक शस्त्रे आणि मनात स्वाभिमानाची जिद्द घेऊन आदिवासी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभे ठाकले. संघटित आदिवासी समाजाची ही ताकद ब्रिटिश प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरली. जानेवारी 1900 मध्ये डोंबारी बुरू टेकडी परिसरात जमलेल्या बिरसा यांच्या अनुयायांवर ब्रिटिश सैन्याने गोळीबार केला. या कारवाईत अनेक आदिवासींना प्राण गमवावे लागले. हा रक्तरंजित प्रसंग आदिवासींच्या संघर्षाच्या इतिहासातील वेदनादायी अध्याय ठरला. ब्रिटिशांनी सैनिकी बळावर उठाव दडपण्याचा प्रयत्न केला, पण त्या संघर्षामागची स्वाभिमानाची भावना संपवणे त्यांच्या हाती नव्हते.
अखेर 3 मार्च 1900 रोजी चक्रधरपूरजवळील जामकोपाईच्या जंगलात बिरसा मुंडा यांना ब्रिटिशांनी अटक करून रांचीच्या तुरुंगात डांबले. पण अवघ्या काही महिन्यांतच, 9 जून 1900 रोजी तुरुंगात त्यांचे निधन झाले. अधिकृत नोंदींमध्ये मृत्यूचे कारण कॉलरा नमूद असले, तरी त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीविषयी पुढील काळात शंका व्यक्त करण्यात आल्या. ज्या वयात भविष्याची स्वप्ने आकार घेत असतात, त्या वयात बिरसा यांनी आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले. अवघ्या 24 वर्षांत त्यांचा जीवनप्रवास संपला. मात्र, एका तरुणाचा आवाज कायमचा दाबला गेला, असे ब्रिटिशांना वाटले असले, तरी त्याने पेटवलेले स्वाभिमानाचे अग्निकुंड पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत बनले.
बिरसा यांच्या संघर्षाचे पडसाद त्यांच्या मृत्यूनंतरही उमटत राहिले. आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण आणि पारंपरिक हक्कांच्या प्रश्नांकडे ब्रिटिश प्रशासनाला गांभीर्याने पाहावे लागले. आदिवासींच्या दीर्घकालीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 1908 मध्ये लागू झालेल्या छोटा नागपूर कूळ कायद्यात जमिनींच्या हस्तांतरणावर निर्बंध घालण्याच्या तरतुदी करण्यात आल्या. बिरसा यांचा लढा एका उठावापुरता मर्यादित राहिला नाही; तो आदिवासींच्या हक्कांसाठीच्या पुढील चळवळींना दिशा देणारा ठरला. त्यांचे कार्य सामाजिक सुधारणांपासून राजकीय स्वातंत्र्याच्या आकांक्षेपर्यंत पोहोचलेले होते.
आज रांचीच्या विमानतळासह विविध संस्था आणि स्मारकांना बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या स्मृती जपण्याबरोबरच स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी वीरांचे योगदान नव्या पिढीसमोर यावे, या उद्देशाने भारत सरकारने 2021 मध्ये 15 नोव्हेंबर हा दिवस ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून घोषित केला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या मुख्य प्रवाहातील इतिहासात तुलनेने कमी अधोरेखित झालेल्या आदिवासी संघर्षाला यानिमित्ताने राष्ट्रीय पातळीवर सन्मानाचे स्थान मिळाले. मात्र, बिरसा यांनी ज्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी संघर्ष केला, ते प्रश्न आजही वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येतात. आदिवासींची संस्कृती, भाषा, परंपरा आणि निसर्गाशी असलेले नाते जपणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि विकासाच्या प्रक्रियेत त्यांना सन्मानाने सहभागी करून घेणे, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. इतिहासात एखाद्या व्यक्तीचे स्थान तिच्या आयुष्याच्या लांबीवर ठरत नाही, तर त्या आयुष्याने समाजावर उमटवलेल्या ठशावर ठरते. बिरसा मुंडा यांचे अवघे 24 वर्षांचे आयुष्य हे त्याचेच प्रभावी उदाहरण! बलाढ्य ब्रिटिश सत्तेसमोर न झुकता त्यांनी आपल्या समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण ‘अबुआ दिशुम, अबुआ राज’मधील स्वाभिमानाचा हुंकार आजही तितकाच जिवंत आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य, समाजाच्या उन्नतीची तळमळ आणि आपल्या मातीशी असलेली अतूट निष्ठा, हाच ‘धरती आबा’ बिरसा मुंडा यांचा खरा वारसा!

‘Dharti Aba’ Birsa Munda

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *