दुष्काळावर मात करणारा जलसंधारणाचा ’पेठ पॅटर्न’
– देवयानी सोनार
यंदा पावसाची अवकृपा झाल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहे. पाणी म्हणजे जीवन असे आपण म्हणतो. जल है तो कल है। पाण्यावाचून जगू शकत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पाणी वाचवा- पाणी जिरवा, पाण्यात कपात करा नाहीतर पाणी कपात मिळेल, असे पाणी बचतीचे संदेश पाहतो, वाचतो; परंतु प्रत्यक्षात किती अंमलात आणतो हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. परंतु पेठ येथील गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांनी संकटातून संधीकडे…दुष्काळावर मात करणारा जलसंधारणाचा अनोखा प्रयोग राबवून प्रशासन आणि जनतेच्या समन्वयातून अशक्य ते शक्य करून दाखविले आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला, निसर्गसौंदर्याने नटलेला आणि आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणारा नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुका. पावसाळ्यात हा परिसर नेहमी हिरवागार दिसतो. मात्र, यंदा अल निनोमुळे आलेल्या संकटाने पेठसह जिल्ह्याची परीक्षा घेतली आहे.सप्टेंबरनंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने तालुक्यासमोर भीषण दुष्काळाचे संकट उभे राहिले. भातशेती करपण्याच्या मार्गावर आली आणि डोंगरावरून वाहणारे झरे, ओढे, नाले आटणे सुरू झाले. शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पेठ तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत केला. पण निसर्गाला दोष देण्यापेक्षा संकटाचे संधीत रूपांतर कसे करायचे, याचा आदर्श पेठ पंचायत समिती प्रशासन आणि तालुक्यातील कष्टाळू जनतेने घालून दिला आहे. अवघ्या आठ दिवसांच्या विशेष मोहिमेतून लोकसहभागाच्या बळावर तालुक्यात 180 हून अधिक वनराई बंधारे उभारून तब्बल नऊ कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी अडविण्यात यश आले आहे. प्रशासकीय इच्छा आणि दूरदृष्टी आणि लोकसहभागाचा समन्वय संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे.
पेठ तालुक्यात पावसाचे प्रमाण तसे चांगले असते; परंतु येथील भौगोलिक रचना पूर्णपणे डोंगराळ आणि उताराची आहे. त्यामुळे पडणारा पाऊस जमिनीत मुरण्याऐवजी ओढे, नाले आणि नद्यांमध्ये वेगाने वाहून जाते. यंदा सप्टेंबरमध्येच पावसाने हुलकावणी दिल्याने प्रश्न गंभीर बनू लागला होता. ऑक्टोबरमध्ये पाण्याचे स्रोेत तळ गाठू लागले होते. वाहून जाणारे पाणी तातडीने अडविले नाही, तर नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण तालुका कोरडाठाक पडेल आणि उन्हाळ्यापूर्वीच पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, याची शक्यता दिसत होती.
या परिस्थितीचे गांर्भीर्य ओळखून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी पेठ तालुक्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचे
निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी आणि त्यांच्या प्रशासकीय टीमने युद्धपातळीवर कामाला सुरवात केली.
पाणी आटण्याची वाट न पाहता जे पाणी शिल्लक आहे आणि जे वाहून जात आहे, ते आजच अडविले पाहिजे, या ध्येयाने प्रेरित होऊन तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींमध्येे अवघ्या आठ दिवसांची एक विशेष जलसंधारण मोहीम हाती घेण्यात आली. सरकारी योजना कागदावर राहू न देता, त्या प्रत्यक्ष जमिनीवर उतरविण्यासाठी गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेतले. शासनाचा हा सकारात्मक आणि संवेदनशील उपक्रम हा आपल्याच हिताचा असून, आपली जनावरे, आपले कुटुंब, आपला तालुका, आपले काम समजून पेठच्या जनतेनेही हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्रमदानातून 180 वनराई बंधारे उभारले. कोणत्याही मोठ्या सरकारी निधीची किंवा कंत्राटदाराची वाट न पाहता गावागावांत ग्रामस्थांनी श्रमदानातून ओढे, नाले, ओहोळ आणि नदीवर योग्य जागांची निवड करून सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये माती आणि वाळू भरून वनराई बंधारे बांधण्यास सुरवात केली. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत महिला बचत गटापासून तरुण मंडळांपर्यंत आणि शासकीय कर्मचार्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वच जण हातात फावडे आणि घमेले घेऊन नाल्यांमध्ये उतरले. याचा चांगला परिणाम दिसला.संपूर्ण तालुक्यात तब्बल 180 पेक्षाही जास्त वनराई बंधारे उभे रहिले. या बंधार्यांमुळे वाहून जाणारे सुमारे नऊ कोटी लिटरपेक्षा अधिक पाणी जागेवरच अडविले गेले यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटला आहे. आदिवासी आणि दुर्गम भागात दुष्काळ पडला की, मोठ्या प्रमाणात गावातील मजूर स्थलांतरित होतात. या स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण खंडित होते. कुटुंबाची ओढाताण होते. पेठ पंचायत समितीने या समस्येकडेही लक्ष घालत मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी आणि त्यांना गावातच हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जलसंधारणाच्या मोठ्या कामाचे नियोजन केले. यात गावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण व रुंदीकरण करणे, तसेच जुने सिमेंट बंधारे व केटीवेअर बंधारे यांची दुरुस्ती करणे, अशी एक हजारापेक्षा जास्त कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे स्थानिक मजुरांच्या हाताला गावातच काम मिळाले आहे. एकाच वेळी जलसंधारण आणि रोजगारनिर्मिती अशी दुहेरी उद्दिष्टे यातून साध्य होताना दिसत आहे. अनेकदा सरकारी यंत्रणा आणि सामान्य नागरिक यांच्यात एक प्रकारची दरी पाहायला मिळते. मात्र, पेठ तालुक्यातील सरकारी यंत्रणा आणि जनतेने नवा आदर्श घालून दिला आहे. हे काम सरकारचे नसून आपल्या गावाचे आणि आपल्याच भविष्याचे आहे, ही भावना प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात रुजविण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. पेठ तालुक्याचा हा जलसंधारण पॅटर्न राज्यातील इतर दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
यशाला मेहनतीची जोड
यंदा महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाच्या अनियमिततेमुळे दुष्काळी सावट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ सरकारी मदतीच्या पॅकेजवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संसाधनाचा वापर करून परिस्थितीवर मात कशी करता येते, याचे उदाहरण पेठ तालुक्याने घालून दिले आहे. 180 वनराई बधारे, नऊ कोटी लिटर पाणीसाठा आणि एक हजाराहून अधिक रोजगार देणारी कामे, ही केवळ आकडेवारी नाही, तर ती एका जिद्दीची आणि सामूहिक इच्छाशक्तीचा परिपाक आहे. संवेदनशील अधिकारी आणि जागरूक नागरिक एकत्र आले तर निसर्गाच्या कोणत्याही संकटावर मात करता येते, हे यातून दिसले आहे. याचा आदर्श इतर तालुक्यांनीही घ्यावा.
From crisis to opportunity…