नाशिकच्या तरुणाची जर्मनीत एव्हिएशन भरारी!

जिद्दीतून जागतिक करिअरचा मार्ग

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन विशेष

नाशिक : देवयानी सोनार
गोदावरीच्या काठावर वसलेले, शांत, सांस्कृतिक आणि निसर्गरम्य वातावरण असलेले नाशिक शहर गेल्या काही वर्षांत केवळ धार्मिक किंवा कृषी क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते एक मोठे एज्युकेशन हब म्हणून नावारूपाला येत आहे. पारंपरिकदृष्ट्या नाशिककर पालकांची मानसिकता आपल्या पाल्याला सुरक्षित आणि जवळच्याच शहरात पुणे किंवा मुंबईत उच्च शिक्षणासाठी पाठवण्याची राहिली आहे. मात्र, बदलत्या काळासोबत नाशिकचे विद्यार्थी आणि पालक आता सातासमुद्रापार झेप घेण्यास राजी होत आहेत. याचेच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे नाशिकचा श्रवण पवार!
दहावीच्या सुट्टीत केवळ एक छंद म्हणून जर्मन भाषेचे धडे गिरवायला सुरुवात करणार्‍या श्रवणने आज थेट जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानाच डिलिव्हरी बॉयच्या नोकरीपासून सुरुवात करून विमान वाहतूक (एव्हिएशन) क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत आपले स्थान निर्माण केले आहे.
परदेशात केवळ पदव्युत्तर (मास्टर्स) शिक्षणासाठीच जाता येते, हा सर्वसाधारण गैरसमज श्रवणच्या बाबतीत दहावीनंतरच दूर झाला. आईने उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याला जर्मन भाषेच्या वर्गात घातले. तिथे ए-2 स्तर पूर्ण करताना त्याला समजले की, जर्मनीत बारावीनंतर थेट पदवीचे (बॅचलर्स) शिक्षण घेता येते. कॅनडामधील मामांनी दिलेल्या प्रोत्साहनानंतर बारावीत असतानाच श्रवणने जर्मनीत जाण्याचा निर्धार पक्का केला. आई-वडिलांनीही आपल्या लाडक्या लेकाला दूर पाठवण्याची मानसिक तयारी करत त्याला भक्कम पाठिंबा दिला. शैक्षणिक सल्लागारांचे मार्गदर्शन आणि इंटरनेटवरील सखोल अभ्यासाच्या जोरावर त्याने 2025 च्या उन्हाळ्यात हॅम्बुर्ग येथील (Hamburg University of Applied Sciences) या नामांकित विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवला.
जर्मनीतील हॅम्बुर्ग या बंदर शहराचे हवामान सुरुवातीला कसोटी पाहणारे ठरले. सततचा पाऊस आणि बोचरे वारे यामुळे सुरुवातीला त्रास झाला. जर्मनीमध्ये एक म्हण आहे, खराब हवामान नसते, तर फक्त अयोग्य कपडे असतात! हळूहळू या हवामानाची आणि तीन-चार वेळा ट्रेन, बस बदलून वसतिगृह गाठण्याच्या प्रवासाची सवय झाली.
आई-वडिलांवर आर्थिक भार पडू नये, या उद्देशाने श्रवणने जर्मनीत पाऊल ठेवताच एक महिन्यात अर्धवेळ डिलिव्हरी बॉयची नोकरी स्वीकारली. कोणताही पूर्वानुभव नसल्याने सुरुवातीला अनेक कंपन्यांकडून नकार पचवावे लागले. ऑक्टोबरमधील कडाक्याच्या थंडीत त्याने डिलिव्हरीचे काम सोडून एका सुपर मार्केटमध्ये नोकरी मिळवली. मात्र, त्याचे ध्येय मोठे होते. 2026 च्या सुरुवातीला त्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि त्याची निवड थेट विमान वाहतूक (एव्हिएशन) क्षेत्राशी संबंधित एका कंपनीत ऑफिसमधील नोकरीसाठी झाली. निवडीचा तो ई-मेल त्याच्यासाठी आयुष्यातील सवार्ंत आनंदाचा क्षण ठरला.

Young man from Nashik takes flight in the field of aviation in Germany!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *