ज्येष्ठांना एनसीएमसी कार्ड सक्ती, महिलांना मात्र सूट

एसटी बसमध्ये वादाचे प्रसंग, वाहकांना डोकेदुखी

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये सवलतीत प्रवास करण्यासाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, हे कार्ड अजूनपर्यंत अनेकांनी काढलेले नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने यात शिथिलता आणत हे कार्ड नसले तरी महिलांना 50 टक्के सवलत दिली जात आहे. तथापि, ज्येष्ठ नागरिकांकडे हे कार्ड नसेल तर त्यांना पूर्ण भाडे द्यावे लागत आहे. एकाच सवलतीसाठी असे दोन भिन्न नियम केल्यामुळे वाहक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये दररोज खटके उडत आहेत. यातून वाहकांची डोकेदुखी वाढली आहे.
एसटी महामंडळाच्या बसेसमधून महिला सन्मान योजनेंंर्गत 50 टक्के सवलत दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांनाही अशीच 50 टक्के आणि 75 च्या पुढे वय असेल तर प्रवास मोफत, अशी महामंडळाची योजना आहे. त्यासाठी एसटीने एनसीएमसी कार्ड सक्तीचे केले आहे. मात्र, या कार्डासाठी केंद्रांची संख्या कमी, त्यात सर्व्हरची अडचण, कार्ड काढण्यासाठी लावाव्या लागणार्‍या रांगा यामुळे आतापर्यंत राज्यात एक कोटी दहा लाखांपयर्ंतच कार्ड वितरित करण्यात आलेले आहे. त्यातच दिवाळीच्या सणात बाहेरगावी जाण्यासाठी महिलांना अडचण येऊ नये म्हणून महामंडळाने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला. तथापि, ही मुदतवाढ फक्त महिलांनाच दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. अजूनही अनेक ज्येष्ठांकडे हे कार्ड नाही. ते वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड वाहकाला दाखवितात. मात्र, वाहकांकडून एनसीएमसी कार्डाची मागणी केली जाते. एकीकडे महिलांना सवलत देताना ज्येष्ठांना मात्र मुदतवाढ दिलेली नसल्याचे वाहकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि वाहक यांच्यात खटके उडत आहेत. वाहकांची यामुळे डोकेदुखी वाढली असून, डिसेंबरपर्यंत सवलत फक्त महिलांसाठीच आहे, हे सांगताना वाहकांच्या नाकीनऊ येत आहे. हे कार्ड नसल्यास ज्येष्ठांना सवलत नाकारण्यात येते. डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ ही फक्त महिलांसाठीच आहे, याबाबत स्पष्ट आदेश एसटीकडून काढलेले नाहीत. त्यामुळे हे कार्ड वाहकांसाठी एक प्रकारची डोकेदुखी ठरत आहे. एसटीने याबाबत स्पष्ट आदेश काढून ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याची गरज आहे.

NCMC card made mandatory for senior citizens; women exempted

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *