निफाडचा पारा 6.5 अंशांवर; द्राक्षबागांवर संकट

ऊसतोड कामगारांचे हाल; बागांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव शक्य

निफाड : तालुका प्रतिनिधी
उन्हाच्या तीव्रतेनंतर अवघ्या एका दिवसात तापमानात मोठी घट होऊन निफाड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गुरुवारी निफाड कृषी संशोधन केंद्रावर 13.9 अंशांवर नोंदवले गेलेले तापमान शुक्रवारी सकाळी थेट 6.5 अंशांवर घसरले. रात्रीतून तापमानात सुमारे सात अंशांची घट झाल्याने संपूर्ण तालुका थंडीने गारठून गेला असून बाजारपेठेत उबदार कपडे व चहाच्या टपर्‍यांवर गर्दी वाढली आहे.
सध्या निफाड तालुक्यात द्राक्ष बागांची मशागत आणि घड व मण्यांचे आकारमान एकसारखे करण्यासाठी डिपिंगची कामे सुरू आहेत. मात्र, वाढत्या थंडीमुळे मुळ्या व पेशींची क्रियाशीलता मंदावून अन्न व पाणी फळापर्यंत पोहोचण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे द्राक्षघडांचे पोषण व आकारावर परिणाम होण्याची भीती आहे. तसेच थंडीमुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे. परिपक्व होत असलेल्या बागांत चिपाटे पेटवून धूर व उब निर्माण करावी लागत असून, पहाटे सूर्योदयापर्यंत ठिबकद्वारे पाणी द्यावे लागत आहे. भारनियमानामुळे पाणी देण्यात अडचणी येत असल्याने महावितरणने अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. वाढती थंडी गहू व हरभरा पिकांसाठी पोषक ठरत असली, तरी थंडी अधिक वाढल्यास कांद्यावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, गोदाकाठ भागात साखर कारखान्यांचा हंगाम सुरू असल्याने कोळपेवाडी, संजीवनी, कादवा, द्वारकाधीश, कादवा गोदा आणि संगमनेर कारखान्यांचे ऊसतोड कामगार शिवारात वास्तव्यास आहेत. उघड्यावर राहणार्‍या या कामगारांच्या कुटुंबांना कडाक्याच्या थंडीत सकाळ-सायंकाळ शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अचानक थंडी वाढल्याने द्राक्ष बागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढून औषधांचा खर्च वाढेल. थंडीमुळे मुळे व पेशींची क्रियाशीलता मंदावते आणि घड व मण्यांच्या वाढीवर परिणाम होतो. थंडी अधिक वाढल्यास बागेत चिपाटे पेटवून उष्णता निर्माण करावी लागेल.
– कैलासराव भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे

Mercury drops to 6.5 degrees in Niphad; vineyards face a crisis

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *