वणी-सप्तशृंगगड घाटरस्त्यावर वाहनांची वर्दळ
सप्तशृंगगड : प्रतिनिधी
दिवाळीच्या सुट्ट्या संपून दैनंदिन कामकाजाला सुरुवात झाली असली, तरी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. सुट्ट्यांच्या हंगामानंतर गडावरील गर्दी ओसरते, असा आजवरचा अनुभव असला, तरी यंदा मात्र कामकाजाचे दिवस सुरू होऊनही मंदिर परिसरात भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला
मिळते आहे.
गेल्या आठवड्यापासून उत्तर महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश व खान्देशातून हजारो भाविकांनी सप्तशृंगगडावर हजेरी लावली आहे. सध्या खासगी वाहने, ट्रॅव्हल्स आणि एसटी बसेसच्या माध्यमातून सहकुटुंब येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे.
परिणामी, वणी ते सप्तशृंगगड घाटरस्त्यावर वाहनांची वर्दळ असून, वाहनतळ परिसरातही मोठी गर्दी दिसत आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून, संबळाचा निनाद व आई सप्तशृंगीच्या नावाने उदो उदो अशा जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला आहे.
नवसपूर्तीसाठी येणार्या भक्तांची संख्या यात लक्षणीय आहे. दरम्यान, भाविकांच्या या अखंड ओघामुळे गडावरील प्रसाद, खण-नारळाचे साहित्य, हॉटेल्स आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. सण-उत्सवापुरती मर्यादित न राहता बाराही महिने सुरू
असलेली ही गर्दी सप्तशृंगगडाच्या वाढत्या धार्मिक पर्यटनाची साक्ष देत आहे.
Saptashrungagad thronged with devotees