मनपाची यंत्रणा असतानाही बांधकाम विभागावर भरोसा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेचा स्वतंत्र बांधकाम विभाग आणि सक्षम यंत्रणा कार्यरत असताना, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी प्रभाग क्रमांक 12 मधील तब्बल 29 विकासकामांची शिफारस थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. ही कामे करण्यासाठी आता पीडब्ल्यूडीने महापालिका आयुक्तांकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली आहे.
या अधिकृत पत्रात थेट महापौरांच्या पत्राचा संदर्भ देण्यात आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा नियोजन विकास कार्यक्रम (सन 2026-27) अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेतून ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 22 जून 2026 रोजी नाशिक महापालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे, या पत्राच्या संदर्भ क्रमांक 1 वर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या 15 जून 2026 रोजीच्या पत्राचा (जा.क्र. 69/महा.कार्या./06/2026) स्पष्ट उल्लेख आहे. महापौरांनी सुचवलेल्या या यादीत प्रभाग क्रमांक 12 मधील विसे मळा, पी अँड टी कॉलनी, समर्थनगर, पारिजातनगर, मॉडेल कॉलनी, लवाटेनगर आणि होलाराम कॉलनी या भागांतील कामांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने उद्यानांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे, ग्रीन जिम व लहान मुलांची खेळणी बसवणे, सभागृह दुरुस्ती, संरक्षक भिंत बांधणे आणि रस्ते काँक्रिटीकरण, अशा कामांचा अंतर्भाव आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी महापालिकेचा ना हरकत दाखला आवश्यक असल्याने पीडब्ल्यूडीने आयुक्तांकडे ही मागणी केली आहे.
महापौरांनी ही स्थानिक कामे महापालिकेच्या यंत्रणेमार्फत न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे का वळवली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.