निफाड हिवाळ्यात का होते थंडा थंडा कूल कूल?

भौगोलिक रचना पाहता तालुका पाण्याचे खोरे असल्याचे तज्ज्ञाचे मत

निफाड : तालुका प्रतिनिधी
दरवर्षी हिवाळ्यात राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात होत असते. त्यामुळे या काळात निफाडला कोणी महाबळेश्वर, कोणी काश्मीर, तर कोणी कुलू-मनाली अशी उपमा देतात. साधारणपणे डिसेंबरअखेर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथे कडाक्याची थंडी पडते. 17 जानेवारी 2020 रोजी निफाडच्या गहू कृषी संशोधन केंद्रावर विक्रमी 2.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
राज्यात निफाडमध्येच सर्वाधिक थंडी का पडते, याचा शोध घेतल्यावर काही मजेशीर आणि तितकेच शास्त्रीय व भौगोलिक मुद्दे समोर येतात. नोव्हेंबरपासून उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी सुरू झाल्यावर तिथून येणारे थंड वारे व शीतलहरी थंडी वाढवतात. निफाडची भौगोलिक रचना पाहता हा तालुका पाण्याचे खोरे आहे. नद्या, कालवे, पाझर तलाव आणि नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यामुळे येथील बहुतांश जमीन बागायती असून, बारमाही ओलावा टिकून राहतो. याशिवाय निरभ्र आकाशामुळे दिवसा तापलेली जमीन रात्री लवकर थंड होते. लोणजाई डोंगर हा अपवादवगळता तालुका तुलनेने सपाट आहे. पश्चिमेकडून डोंगर वाटणारा हा भाग पूर्वेकडे सपाट दिसतो. बागायती क्षेत्रामुळे गारवा अधिक जाणवतो; मात्र उन्हाळ्यात थंड वार्‍यांच्या अभावामुळे हा गारवा टिकून राहत नाही.
यंदा कमी पावसामुळे थंडी कमी पडेल, असा अंदाज होता. मात्र, नेहमीपेक्षा महिनाभर आधीच म्हणजे नोव्हेंबरमध्येच थंडी दाखल झाली आहे. नेहमी तापमानाचा पारा हळूहळू अर्धा-एक अंशाने खाली येतो किंवा काही दिवस स्थिर राहतो. परंतु, एकाच दिवसात थेट 13.9 अंशांवरून 6.5 अंशांपर्यंत पारा घसरण्याची ही पहिलीच वेळ असावी. या अचानक गारठ्यामुळे नागरिकांना सर्दी-पडशाचा सामना करावा लागत असून, स्वेटर-मफलर बाहेर काढावे लागले आहेत. थंडीचे प्रमाण किती आहे, यावर तिचे फायदे-तोटे अवलंबून असतात; सौम्य थंडी पिके व आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, तर थंडीचे दुष्परिणामही जाणवतात.

निफाड तालुक्याच्या चौफेर भागात पाणी फिरलेले आहे. यामुळे हवेत गारवा निर्माण होतो, तसेच निरभ्र आकाश यामुळे तापलेली जमीन लवकर थंड होते. याचाही परिणाम थंडी वाढण्यावर होतो. सध्या उत्तरेत बर्फवृष्टी होत असल्याने तिकडून येणार्‍या थंड वार्‍यामुळे थंडीत वाढ होते.
-भरत मालुंजकर, सहाय्यक कृषी संशोधक,
कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्र, निफाड

 

Why does Niphad become nice and cool in the winter?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *