अतिरिक्त उत्पादन; अंदाजाने कांदा उत्पादक धास्तावले

वर्षभर 3 हजार रुपये दराची मागणी; निर्यातीसाठी स्थिर धोरण राबविणे गरजेचे

लासलगाव : वार्ताहर
कांदा उत्पादनात संभाव्य वाढ आणि आगामी काळात बाजारपेठेत होणारी आवक लक्षात घेता कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये बाजारभाव घसरण्याची चिंता वाढली आहे. अतिरिक्त उत्पादनामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी कांद्याला वर्षभर किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच कांदा निर्यातीसाठी दीर्घकालीन व सातत्यपूर्ण धोरण निश्चित करून जागतिक बाजारपेठांचा विस्तार करावा, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी
केली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या तिसर्‍या सुधारित आगाऊ अंदाजानुसार, 2025-26 या वर्षात देशातील कांदा उत्पादन 288.96 लाख टन होण्याचा अंदाज आहे. देशाची वार्षिक कांदा गरज सुमारे 210 लाख टन असल्याने उत्पादन आणि देशांतर्गत गरज यामध्ये सुमारे 78.96 लाख टनांचे अंतर दिसून येते. मात्र, साठवणुकीतील नुकसान, बियाणे, प्रक्रिया उद्योग आणि अन्य वापर विचारात घेणेही आवश्यक आहे. मागील वर्षी 2024-25 मध्ये कांद्याचे उत्पादन 307.67 लाख टन होते. यंदा उत्पादनात 6.08 टक्क्यांची घट अपेक्षित असली तरी अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता आणि सुधारित शेती पद्धतीमुळे एकरी उत्पादकता वाढण्याची शक्यता असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
कांद्याची आवक वाढल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाल्यास बाजारभावात मोठी घसरण होऊ शकते. याचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसतो. त्यामुळे कांद्याला केवळ हंगामापुरता नव्हे, तर वर्षभर किमान 3 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळेल, अशी प्रभावी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली आहे.

निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरणाची गरज

भारतीय कांद्याला आखाती देश, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, नेपाळ यांसह विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मागणी आहे. मात्र, निर्यात धोरणातील वारंवार होणारे बदल आणि अनिश्चिततेमुळे निर्यातदारांना नियोजन करणे कठीण जाते. त्यामुळे केंद्र सरकारने दीर्घकालीन व स्थिर निर्यात धोरण स्वीकारून नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठा विकसित कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी आधुनिक पॅकिंग हाउस, प्रतवारी केंद्रे, गुणवत्ता तपासणी, वाहतूक व्यवस्था आणि शीतसाखळी विकसित करावी. कांदा पावडर, कांदा फ्लेक्स आणि डिहायड्रेटेड कांदा यांसारख्या प्रक्रिया उत्पादनांना प्रोत्साहन देऊन मूल्यवर्धित निर्यातीसाठी विशेष योजना राबवाव्यात, असेही संघटनेने सुचविले आहे.

उत्पादन व साठ्याची पारदर्शक माहिती द्यावी

देशातील कांद्याचे उत्पादन, उपलब्ध साठा, देशांतर्गत मागणी, निर्यात आणि साठवणुकीतील नुकसान यांची नियमित व पारदर्शक आकडेवारी उपलब्ध करून द्यावी. शेतकरी संघटना, निर्यातदार आणि शासन यांच्यात नियमित समन्वय ठेवावा. कांद्याच्या दरातील अनिश्चितता कमी करून उत्पादकांना आर्थिक संरक्षण मिळेल असे धोरण आखण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. कांदा उत्पादकांना योग्य दर मिळवून देताना ग्राहकांनाही रास्त दरात कांदा उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र, ग्राहकहिताच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या उत्पादनाला कमी भाव मिळू नये. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Surplus production; onion farmers alarmed by projections

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *