नाशिक : प्रतिनिधी
नाशिककरांचा रविवार म्हणजे मिसळवार! रविवारची सकाळ झाली की, शहरातील मिसळच्या हॉटेल्समध्ये खवय्यांची गर्दी उसळते. कुटुंबीय, मित्रमंडळींसह मिसळचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर पडणार्या नाशिककरांची संख्या मोठी असते. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या अलीकडील कारवाईमुळे मिसळप्रेमींच्या गर्दीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे रविवारी (दि. 22) शहरातील चित्रातून दिसले. नेहमीच्या तुलनेत काही मिसळ केंद्रांवरील गर्दी कमी असल्याचे चित्र होते.
नाशिकची मिसळ ही केवळ खाद्यसंस्कृती नसून शहराची स्वतंत्र ओळख आहे. रविवारच्या सुटीत सकाळी नाश्ता करण्यासाठी मिसळ केंद्रांवर जाणे, ही अनेक नाशिककरांची आवडती परंपरा आहे. शहरातील प्रसिद्ध मिसळ केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागतात. काही ठिकाणी टेबल मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. मात्र, अलीकडे अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेबाबत प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये काही प्रमाणात सावधगिरी वाढल्याचे दिसते. अन्न व औषध प्रशासनाकडून विविध खाद्य आस्थापनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे हॉटेलमधील स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि वापरल्या जाणार्या साहित्याबाबत ग्राहक अधिक जागरूक झाले आहेत. मिसळ खाण्यासाठी बाहेर पडताना कोणत्या हॉटेलमध्ये जायचे, याबाबतही ग्राहक निर्णय घेत असल्याचे चित्र आहे.
नेहमीच्या तुलनेत काही ठिकाणी गर्दी कमी असल्याने कारवाईचा परिणाम खाद्यसंस्कृतीशी जोडलेल्या या व्यवसायावर कितपत होतो, याची चर्चा सुरू झाली आहे.
खाऊगल्ल्यांवर कारवाईकडे लक्ष
’एफडीए’कडून शहरातील बड्या हॉटेलांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र, शहरातील अनेक भागांत असलेल्या खाऊगल्ल्यांवरदेखील अस्वच्छता असल्याचे निदर्शसनास येते. उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करण्याबरोबरच अस्वच्छ वातावरणातच ग्राहक या पदार्थांंवर ताव मारत असल्याचे चित्र शहरातील विविध खाऊगल्ल्यांमध्ये पाहावयास मिळते. तेथील अस्वच्छता डोळ्याने दिसत असूनही एफडीएला अजूनपर्यंत दिसली नाही का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. त्यामुळे या खाऊगल्ल्यांंवर ’एफडीए’कडून कारवाई होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Sunday is ‘Misal’ day… but the crowd faces the brunt of enforcement action