सिडको : प्रतिनिधी
असाध्य आजार बरा करण्यासह घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेची सात लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करणार्या भोंदूबाबाला गुन्हे शाखा अंबड युनिट- 3 च्या पथकाने अटक केली. महिनाभरापासून फरार असलेला संशयित अरुण धोंडू पाटील (वय 48, रा. ध्रुवनगर, नाशिक) याला मखमलाबाद परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता, 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2022 पासून 19 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संशयिताने एका महिलेला विविध आमिषे दाखवली. महिलेचा अस्थमाचा आजार पूर्णपणे बरा करण्यासह तिच्या घरी पैशांचा पाऊस पाडण्याचे आश्वासन त्याने दिले. यासाठी सोमेश्वर धबधब्याजवळ गोदावरी नदी परिसरात तसेच महिलेच्या घरी अघोरी पूजा केल्याचे सांगण्यात आले. पुजेच्या नावाखाली महिलेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला पारदर्शक कपडे परिधान करण्यास सांगण्यात आले. तसेच तिला पूर्णपणे पाण्याने भिजवून अघोरी विधी करण्यात आले. या विधींच्या बदल्यात संशयिताने महिलेकडून सात लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र, आश्वासनांची पूर्तता न करता ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून महिलेची फसवणूक केली.
याप्रकरणी 19 ऑक्टोबर रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित फरार झाला होता. तो नाशिक शहर आणि आसपासच्या परिसरात ठिकाण बदलून वास्तव्य करीत होता. दरम्यान, तो मखमलाबाद येथील मेंदळे वस्ती परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार गुन्हे शाखा अंबड युनिट-3 चे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि पथकाने सोमवारी (दि. 23) पहाटे साडेपाचच्या सुमारास आळंदी पाट, मेंदळे वस्ती येथे सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित शेताच्या दिशेने पळू लागला.
मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक जग्वेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्यासह गौरव धात्रक, महेंद्र दोंदे, राजेश महाले आणि अन्य अधिकारी व कर्मचार्यांनी केली. दरम्यान, गंगापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. गंगापूर पोलीस तपास करीत आहेत.
Absconding fake godman Arun Patil nabbed