साहित्य संमेलनाध्यक्षपदी लिंबाळे

अध्यक्षपदाचा सोलापूरला दुसर्‍यांदा मान

सोलापूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे पुणे येथे जानेवारी महिन्यात होणार्‍या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाल्याने सोलापूरच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अरण्यऋषी स्वर्गीय मारुती चित्तमपल्ली यांना यापूर्वी अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदसुद्धा दुसर्‍यांदा डॉ. लिंबाळे यांच्या रूपाने सोलापूरला मिळाले आहे.
मराठी साहित्याला सामाजिक वास्तवाची नवी दिशा देणारे, दलित साहित्याचा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे आणि आपल्या लेखनातून समाजव्यवस्थेतील विषमता, अन्याय व शोषणावर परखड भाष्य करणारे लिंबाळे यांच्या साहित्यिक योगदानाचा हा मोठा गौरव मानला जात आहे.
ज्यांच्या लेखणीतून वंचित, उपेक्षित आणि शोषित समाजाचे दुःख, वेदना आणि संघर्ष प्रभावीपणे व्यक्त झाले, अशा साहित्यिकाला मराठी साहित्याच्या सर्वोच्च व्यासपीठाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे, ही केवळ त्यांच्या व्यक्तिगत कारकिर्दीतील महत्त्वाची घटना नसून समतावादी साहित्य चळवळीचाही सन्मान आहे.
डॉ. लिंबाळे यांचा जन्म 1 जून 1956 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे झाला. अत्यंत प्रतिकूल सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. जातीय विषमता, गरिबी, सामाजिक उपेक्षा आणि मानवी प्रतिष्ठेसाठी करावा लागणारा संघर्ष या अनुभवांनी त्यांच्या लेखनाला दिशा दिली. त्यांच्या साहित्यामध्ये या वास्तवाचे अत्यंत संवेदनशील आणि वास्तववादी चित्रण आढळते. साहित्यकृतींमध्ये या पुस्तकांचा समावेश
कथा, कादंबरी, कविता, आत्मकथन, समीक्षा आणि वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नावावर चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाल्याची नोंद आहे. अक्करमाशी,उपल्या, हिंदू, दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र,दलित साहित्य आणि सौंदर्य,शतकातील दलित विचार,सनातन, झुंड,आदी

सोलापूरच्या मातीतील जन्म
सोलापूर जिल्ह्याच्या मातीत जन्मलेल्या एका साहित्यिकाने आपल्या लेखणीच्या बळावर राष्ट्रीय साहित्यविश्वात स्वतःची ओळख निर्माण केली, ही सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. संघर्षमय जीवनातून आलेले अनुभव त्यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर मांडले. त्यांच्या साहित्याने उपेक्षितांच्या वेदनांना शब्द दिले आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना बळ दिले.सोलापूरच्या साहित्यिक परंपरेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करणारे डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे साहित्यिक योगदान आगामी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे,
– पद्माकर कुलकर्णी,महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष

शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ऐतिहासिक
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या शतक महोत्सवी वर्षात अध्यक्षपदाचा बहुमान मिळणे ही विशेष महत्त्वाची बाब ठरणार आहे.

प्राध्यापक ते ज्येष्ठ साहित्यिक
डॉ. लिंबाळे यांनी मराठी विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर ’मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन निग्रो साहित्य : तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात दूरसंचार विभागातील टेलिफोन ऑपरेटर पदापासून झाली. पुढे त्यांनी आकाशवाणीमध्ये उद्घोेषक म्हणूनही काम केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्राध्यापक आणि संचालक म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. शैक्षणिक, संशोधनात्मक आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले.

Limbale appointed president of the literary conference (Sahitya Sammelan)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *