– आनंदा जाधव
भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. भाव वाढले की, शहरी ग्राहकांचे डोळे पाणवतात आणि भाव कोसळले की, उत्पादक शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी येते. एकंदरीतच कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे, तर कधी धोरणात्मक निर्णयांमुळे कांदा उत्पादकांचा वांधा ठरत आला आहे. सध्या पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर असतानाही नदी, कालवे आणि धरणाकाठच्या भागातील शेतकरी महागडी रोपे घेऊन कांदा लागवडीसाठी धडपडताना दिसत आहेत. मात्र, इतका मोठा खर्च करूनही पाणी साथ देईल का आणि पीक हातात आल्यानंतर अपेक्षित बाजारभाव मिळेल का, या प्रश्नाचे ठोस उत्तर कोणाकडेही नाही.
यंदा पावसानेच पाठ फिरवल्याने शेतकर्यांचे कांदा लागवडीचे संपूर्ण गणित कोलमडले आहे. येवला, नांदगाव, मालेगाव आणि सिन्नर तालुक्यांत ज्या शेतकर्यांनी आगाऊ बियाणे पेरून रोपे तयार केली, त्यांच्या विहिरींची पातळी वेगाने खालावली. परिणामी अनेक शेतकर्यांवर रोपे विक्री करण्याची वेळ आली. दुसरीकडे, निफाडचा सधन भाग, सिन्नरचा कडवा कालवा परिसर, येवल्याचा पालखेड व नांदूरमध्यमेश्वर कालवापट्टा, तसेच दिंडोरीतील पालखेड, करंजवण, ओझरखेड, वाघाड व हतनूर धरण कालव्यालगतचा भाग वगळता इतरत्र पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे.
ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, तेथे आगामी लागवडीचे नियोजन सुरू झाल्याने कांदा रोपांच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. मागणी अचानक वाढून पुरवठा घटल्याने एका पायलीचा दर थेट 30 हजारांपासून 55 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यंदा कांदा रोपांना अक्षरशः सोन्याचा भाव आला असून, निफाड तालुक्यातून मोठी मागणी नोंदवली जात आहे. खरीप हंगामातील अनेक पिकांचे गणित पावसाअभावी बिघडल्याने झालेला आर्थिक फटका भरून काढण्यासाठी शेतकर्यांची भिस्त आता आगामी कांदा लागवडीवर आहे.
सध्या जिल्ह्यातील 19 सहकारी आणि 6 खासगी अशा 25 बाजार समित्यांतून लाल कांद्याची सुमारे 50 हजार क्विंटल आवक होत आहे. उन्हाळ कांदा संपत आला असला, तरी त्याचीही जवळपास दहा हजार क्विंटल आवक सुरू आहे. लाल कांद्याला कमाल 4,849 रुपये आणि सरासरी 4,351 रुपये प्रतिक्विंटल, तर उन्हाळ कांद्याला कमाल 4,400 रुपये आणि सरासरी 4,151 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. सध्या मिळणारे हे समाधानकारक दर पुढेही टिकून राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यातच सिंचनासाठी गोदावरी कालव्यांना सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पाण्याची टंचाई, उन्हाची तीव्रता आणि त्यामुळे घटलेली बियाण्यांची उगवणक्षमता यामुळे अनेक भागांत वेळेत रोपे तयार करणे कठीण झाले. येवल्यातील सायगाव, कोळम, भारम, दरवंडी, खरवंडी, नागडे, धामणगाव, पांजरगाव, सातारे, न्याहारखेडे, रेंडाळे, रायते, अंगणगाव आणि वाईबोथी आदी गावांतून निफाडमधील शेतकरी रोपे घेत आहेत. चांदवड, सिन्नर, निफाड आणि येवल्याच्या काही भागांत लाल कांदा लागवड अंतिम टप्प्यात किंवा सुरू असली, तरी मागील वर्षाच्या तुलनेत लागवडीत सुमारे 75 टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रेट, वाफा किंवा लागवड क्षेत्रानुसार वेगवेगळे दर देऊन कसेही करून रोप पदरात पाडून घेण्याची धडपड सुरू आहे.
उन्हाळ कांद्यात मोठी घट होण्याचा अंदाज असल्याने लाल कांद्याकडे कल वाढला असला, तरी तो कमी काळ टिकणारा असतो. थंडीचे वातावरण पोषक ठरत असले, तरी मार्च-एप्रिलमध्ये उन्हाचा पारा वाढल्यावर हा कांदा किती काळ टिकेल आणि तोपर्यंत पाणी पुरेल का, याची चिंता कायम आहे. मशागत, लागवड, खते, कीटकनाशके, निंदणी आणि साठवणूक-विक्रीपर्यंतचा प्रचंड खर्च, शिवाय नैसर्गिक आपत्ती, रोगराई, बनावट निविष्ठा आणि वीज भारनियमन यामुळे कांदाशेती हा एक प्रकारचा जुगार ठरत आहे. तरीही अडचणीच्या काळात आधार देणारे नगदी पीक म्हणून शेतकरी पुनः पुन्हा त्यावरच विश्वास ठेवतो.
भाव वाढले की, शहरी ग्राहकांची ओरड आणि भाव पडले की, शेतकर्यांचा आक्रोश, अशा दुहेरी कोंडीत सरकार सापडते. उत्पादन क्षेत्राजवळ कांदा प्रक्रिया व पूरक उद्योग उभारल्यास कोसळणार्या दरांना काहीसा आळा बसू शकतो. मात्र, निर्यातबंदी किंवा आयातीचे धोरण राबवून ग्राहकांच्या हिताला प्राधान्य दिले जाते, असा आरोप होतो. यंदा कांदा उत्पादनात सुमारे 60 टक्के घट होण्याचा अंदाज असल्याने बाजारभावात तेजी राहू शकते, पण सरकारने कांदा आयात न केल्यासच शेतकर्यांना दिलासा मिळेल, अन्यथा पुन्हा संकटाचा सामना करावा लागेल. बाजारभाव आणि निसर्गाच्या कात्रीत सापडलेल्या शेतकर्यांची बाजू पुराव्यानिशी मांडण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. निवडणुका आल्या की, कळवळा आणि नंतर दुर्लक्ष, हेच दुष्टचक्र कायम राहिल्यास कांद्याचा वांधा कधीच संपणार नाही.
Why is there always a problem when it comes to onions?