आरबीआयने गोल्ड लोनवर दिला सावधानतेचा इशारा

सोन्याचे भाव कोसळले; गोल्ड लोन घेतलेल्यांचे आता काय होणार?

मुंबई : प्रतिनिधी
तुम्हीही घरातील सोन्याचे दागिने तारण ठेवून गोल्ड लोन घेतले आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने देशातील मोठ्या बिगर बँक वित्तीय संस्था (एनबीएफसी)च्या सीईओंना बोलावून गोल्ड लोनवर कडक इशारा दिला आहे. सोन्याचे भाव कोसळत आहेत, एलटीव्ही वाढत आहे, आता जास्त सावधगिरी बाळगा, खूप वेगाने वाढू नका.
यामागे कारण काय? तर, जानेवारीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.80 लाख रुपयांपेक्षा जास्त होता, 20 नोव्हेंबर रोजी तो 1.20 लाख रुपयांवर म्हणजेच 14 महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे, म्हणजे 30-35% पेक्षा जास्त घसरण. सोन्याचा भाव पडला की, तुम्ही तारण ठेवलेल्या सोन्याची किंमतही पडते, पण तुमचे कर्ज मात्र तेवढेच राहते.
एलटीव्ही म्हणजे काय?
एलटीव्ही म्हणजे लोन टू व्हॅल्यू अर्थात, सोन्याच्या किमतीच्या किती टक्के कर्ज दिले. समजा, एक लाख रुपयांच्या सोन्यावर तुम्हाला 75,000 रुपये कर्ज मिळाले- एलटीव्ही 75%. आता सोन्याचा भाव 10% पडून सोने 90,000 रुपयांचे झाले, तर तेच कर्ज आता 83% पेक्षा जास्त होते. 1 एप्रिल 2026 पासून आरबीआयचा नियम आहे की, 2.5 लाखांपर्यंतच्या कर्जावर जास्तीत जास्त 85%, 2.5 ते 5 लाखांवर 80%, पाच लाखांवरील कर्जावर 75% एलटीव्ही दिला जावा. आता काही कर्जांमध्ये एलटीव्ही 100% पेक्षा जास्तही गेल्याचे लक्षात येत आहे. म्हणजे कर्जाची रक्कम सोन्याच्या किमतीपेक्षाही जास्त झाली आहे, असे समोर आले आहे. अशा वेळी तुम्ही कर्ज फेडले नाही, तर लिलाव करूनही कंपनीला पूर्ण पैसे परत मिळणार नाहीत, म्हणून आरबीआयने बँका आणि एनबीएफ गेल्या 30-45 दिवसांपासून गोल्ड लोन पोर्टफोलिओचे महिन्याऐवजी जास्त वारंवार रिपोर्टिंग करण्यास सांगितले आहे आणि एनबीएफसीना आता आणखी आक्रमक कर्ज देऊ नका, नवीन टेक्नॉलॉजी पार्टनर घेताना सायबर धोका तपासा आणि दहा कोटी रुपयांचे नेट ओन्ड फंड मार्च 2027 पर्यंत गाठले नाही, तर आणखी मुदतवाढ नाही, असेही स्पष्ट केले आहे.
तुमच्यावर काय परिणाम होणार? पुढे काय होईल?
मार्जिन कॉल येऊ शकतो : एलटीव्ही मर्यादेपेक्षा जास्त गेली तर कंपनी तुम्हाला फोन करून सांगेल – एकतर आणखी सोने तारण ठेवा, किंवा कर्जाचा काही भाग फेडा. नाही केले तर तुमचे सोने लिलावात जाऊ शकते. काही कंपन्यांनी आधीच मार्जिन कॉल आणि लिलाव वाढवले आहेत – उदा. इंडेल मनीच्या 20% पोर्टफोलिओचा एलटीव्ही 80% पेक्षा जास्त आहे. नवे कर्ज मिळणे कठीण/कमी मिळेल : कंपन्या आता नव्या कर्जावर 67-68% इतकाच कमी एलटीव्ही देत आहेत, म्हणजे त्याच सोन्यावर आधीपेक्षा कमी पैसे मिळतील. बुलेट पेमेंट बंद, आता मासिक हप्ता : आधी 12 महिन्यांनंतर एकदाच मुद्दल आणि व्याज फेडायची पद्धत होती, आता 1 वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या कर्जावर दर महिन्याला व्याजाचा हप्ता भरावा लागणार आहे. एक हप्ता चुकला तरी ते एसएमए-1 मध्ये जाईल. याच बदलामुळे बजाज फायनान्सच्या स्टेज-2 गोल्ड लोन 0.65% वरून 4.51% वर, मणप्पुरमचे सुमारे 5% वर गेले आहेत.
एनपीए दुप्पट झाले : ट्रान्सयुनियन सिबिलनुसार गोल्ड लोन एनपीए 31 मार्चच्या 0.16% वरून ऑगस्ट अखेर 0.30% वर गेला आहे. 27% कर्जदारांकडे 4 किंवा अधिक गोल्ड लोन आहेत, आणि अनेकांनी दुसर्‍या कर्जाचे हप्ते चुकवलेले असतानाही गोल्ड लोन घेतले आहे, त्यामुळे धोका वाढला आहे.

तुम्ही काय करावे?
♦ तुमच्या कर्जाचा एलटीव्ही किती झाला आहे, हप्त्याची तारीख काय आहे, हे कंपनीला विचारून घ्या.
♦ मार्जिन कॉल आला तर दुर्लक्ष करू नका- थोडा भाग फेडा किंवा सोने वाढवा, नाहीतर लिलावाची नोटीस येईल. लिलावाआधी नोटीस देणे आणि राखीव किंमत सोन्याच्या सध्याच्या किमतीच्या किमान 90% ठेवणे, हा आरबीआय नियम आहे.
♦ गोल्ड लोन घेऊन सोने खरेदी करू नका. आरबीआयने ते बंद केले आहे.

RBI issues a cautionary note regarding gold loans

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *