सिंहस्थ थीमवरील बैलजोडी ठरली आकर्षण
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शतकांची परंपरा असलेला
त्रिपुरारी रथोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. यंदा रथमार्ग असलेल्या मेनरोडचा गंगास्लॅब तोडल्याने रथ मिरवणूक काढण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाने यावर सकारात्मक पर्याय शोधत परंपरा अखंड राखली.
मंदिरानजीकच्या लक्ष्मीनारायण चौकापर्यंत पारंपरिक पद्धतीने मानकर्यांच्या बैलजोड्यांच्या सहाय्याने रथ आणण्यात आला. तेथून पंचमुखी सुवर्ण मुखवटा पालखीत ठेवून मेनरोडमार्गे कुशावर्त तीर्थावर नेण्यात आला. स्नान व महापूजा आटोपल्यानंतर पालखीतून मुखवटा पुन्हा लक्ष्मीनारायण चौकात आणून रथात विराजमान करण्यात आला आणि विद्युत रोषणाईने झगमगणारा रथ मंदिराच्या प्रवेशद्वारी
परतला.
मिरवणुकीचा प्रारंभ आरतीने झाला असून, मानकर्यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले. नागरिकांनी पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. विश्वस्त मंडळाने मिरवणुकीत सहभाग नोंदवला. वैकुंठ चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. रात्री आठच्या सुमारास मंदिरातील दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली व महिलांनी त्रिपुर वाती लावण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
रथाला चार बैलजोड्या
पालखी सोहळ्याची मानाची बैलजोडी पारंपरिक मानकरी माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, अजय अडसरे आणि बाळासाहेब अडसरे यांनी सिंहस्थ कुंभमेळा थीमवर सजवली होती. युवा चित्रकार विशाल पाटेकर यांनी बैलांच्या अंगावर महादेव व हर हर गंगेची आकर्षक चित्रे रेखाटली होती. रथाला नितीन माळी यांनी विद्युत रोषणाई, तर कैलास माळी यांनी पुष्पसजावट केली होती.
Tripurari Rathotsav held in a devotional atmosphere at Trimbak