दगडाने ठेचून तरुणाचा खून
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
दारू पिताना झालेल्या वादातून शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करणार्या आरोपीला नाशिकरोड युनिट गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तब्बल 150 सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला चेतनानगर परिसरातील बांधकाम साइटवरून ताब्यात घेण्यात आले.
सतीश श्रावण रौंदळ (38, रा. शिवाजी चौक, सिडको) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 8 नोव्हेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी सतीश यांचा 15 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी 9 नोव्हेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार नाशिकरोड युनिटचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना लेखानगर परिसरात एक संशयित दिसून आला. मात्र, त्याची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी लेखानगर ते पाथर्डी फाटा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने शोध सुरू ठेवला. तपासाची व्याप्ती वाढवत वाडीवर्हेपर्यंत संशयिताचा माग काढण्यात आला. दरम्यान, सुमारे 150 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयित कमोदनगर परिसरातून पायी जात असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या हालचालींचा माग काढताना तो बांधकाम मजूर असल्याचे
निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी कमोदनगर, बापू बंगला, चार्वाक चौक आणि चेतनानगर परिसरातील बांधकाम साइटवर जाऊन मजुरांकडे चौकशी केली. संशयिताचे छायाचित्र दाखवून त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. अखेर सोनवणे मळा, चेतनानगर येथील बांधकाम साइटवर तो काम करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी विकेश ऊर्फ विकी रामलाल कोल (29, मूळ रा. टिकर, जिल्हा सतना, मध्य प्रदेश) याला मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले. चौकशीत घटनेच्या दिवशी सतीश रौंदळ आणि आरोपी एकत्र दारू पीत होते. त्यावेळी सतीश यांनी शिवीगाळ केल्याचा राग आल्याने विकीने त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती समोर आली. आरोपीला पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिटके यांच्याकडून कारवाईची माहिती
सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. या गुन्ह्याचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक काजल मोरे करीत आहेत.
Anger over being subjected to verbal abuse while the other person was under the influence of alcohol