इगतपुरीत पंचवटी एक्स्प्रेसखाली येऊन मामा-भाचा गंभीर जखमी

भाच्याने गमावला पाय; मामाच्या हाताची बोटे तुटली

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी रेल्वेस्थानकावर पंचवटी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना घडलेल्या दुर्दैवी अपघातात 12 वर्षीय भाचा व त्याचे मामा गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत भाच्याने आपला एक पाय गमावला असून, मामाच्या हाताची बोटेही तुटली असून, ते गंभीर जखमी आहेत. दोघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकावर थांबलेली असताना 12 वर्षीय मुलगा लघुशंकेसाठी खाली उतरला होता. मात्र, तो खाली असतानाच गाडी अचानक सुरू झाली. चालती गाडी पकडण्यासाठी मुलाने धाव घेतली असता तोल जाऊन तो रेल्वेखाली पडला. भाच्याला संकटात पाहताच त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या मामालाही या प्रयत्नात गंभीर दुखापत झाली. यात मुलाच्या पायाला जबर मार लागल्याने त्याला एक पाय गमवावा लागला, तर मामाच्या हाताची बोटे व शरीराला गंभीर इजा झाली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे पाठविले. अद्याप त्यांची नावे समजू
शकलेली नाहीत.

एका मिनिटाच्या थांब्यावर प्रश्नचिन्ह
या अपघातामुळे पंचवटी एक्स्प्रेसच्या स्थानकावरील थांब्याच्या वेळेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही गाडी अनेक स्थानकांवर अवघा एक मिनिट थांबत असल्याने प्रवाशांना चढ-उतार करताना मोठी धावपळ करावी लागते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सामानासह प्रवास करणार्‍यांची मोठी गैरसोय होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून रेल्वे प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेसच्या थांब्याची वेळ वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Uncle and nephew critically injured after being hit by Panchavati Express in Igatpuri

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *