निती आयोगाचे सल्ले

– राजेश शिरभाते

राज्यातील विविध प्रकल्पांसाठी व ते सुरळीत कार्यान्वित होण्यासाठीचे अनेक महत्त्वाचे सल्ले काल निती आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. वास्तविक त्यातील अनेक बाबी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दीर्घ प्रशासकीय अनुभवाद्वारे लक्षात आलेले असणारच, यात काही शंका नाही. उद्याच्या प्रकल्पासाठी आजच स्वस्तातील जमीन अधिग्रहित किंवा विकत घेऊन ठेवण्याचा सल्ला आयोगाने सरकारला दिला आहे. तो अगदी योग्यच आहे. या देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस सरकारने आपल्या प्रत्येक प्रकल्पात त्याचा अवलंब केला होताच. त्याला आता नव्याने उजळणी मिळाली आहे. यात सामान्य माणसांच्या आणि पर्यावरणाचा योग्य तो समतोल राखला जावा, ही अपेक्षा आहे. स्वस्तात जमीन खरेदी करणे हा जरी व्यावहारिक सल्ला असला, तरी त्याचे अनेक परिणाम लोकांवर होत असतात. चांगल्या सरकारने लोकांच्याही हिताकडे पाहिले पाहिजे.

देशाच्या जडणघडणीत देशात राबवल्या गेलेल्या प्रकल्पांना नेहमीच महत्त्वाचे स्थान असते. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी देशहित हे सर्वप्रथम पाहिले जाते. प्रकल्पांच्या उभारणीबरोबरच हे प्रकल्प पुढील काही शतके अशाच पद्धतीने कार्यान्वित राहिले पाहिजेत किंवा त्यामध्ये जेव्हा जेव्हा वाढ करण्याची गरज निर्माण होईल त्या त्या वेळेस पायाभूत सुविधा तरी उपलब्ध असल्या पाहिजेत. ही प्रकल्पांची पहिली अट असते. त्यामुळे भारतात ब्रिटिशांनी केलेल्या आणि त्यानंतर काँग्रेस सरकारांनी केलेल्या कामात या गोष्टीत महत्त्व देण्यात आले. देशात काँग्रेसने निर्माण केलेल्या कोणत्याही आयआयटी संस्थेची प्रांगणे पाहिल्यास या गोष्टीचा पुरावा मिळतो. ज्या काळात केवळ काही प्रकारचे शिक्षण दिले जात होते. त्यावेळी आयआयटीने पुढील शंभर वर्षांत या नव्या अभ्यासक्रमांसाठी जागा राखून ठेवल्या होत्या. मुंबई आयआयटीकडे स्वतःचे शहर वसवता येईल इतकी जमीन तेव्हापासून आहे. त्या-त्या सरकारांनी कोणत्याही खाजगी विकासकाच्या भल्यासाठी या जागा दिल्या नाहीत. त्याच प्रकारे देशात रेल्वेचाही विस्तार करण्यात आला. रेल्वेच्या कारखान्यांसाठी, रेल्वेस्थानकांसाठी, जंक्शनसाठी किंवा इतर सुविधांसाठीही आधीच्या सरकारांनी मोठ्या प्रमाणातील जागा आपल्या ताब्यात ठेवली. सरकारी गृहनिर्माण वसाहतींमधील जागाही अशाच प्रकारे राखवण्यात आली. भेल किंवा इतर अवजड उद्योगांसाठीच्या जागांचीही अगणित उदाहरणे देता येतील. इंदिरा गांधींच्या काळात जेव्हा संपूर्ण सहार गाव राखून ठेवण्यात आले होते. त्यावर आज विमानतळ आणि मेट्रो उभ्या आहेत. होता होईतो सामान्य माणसांना त्रास न देता त्यांच्यासाठी प्रकल्प उभारण्यावर काँग्रेसने भर दिला होता. अर्थात, त्या वेळेसच्या सरकारांनी असे म्हणायला हवे मात्र आताशा पक्षाच्या सरकारांचा उल्लेख करण्याची नवी पद्धत आली असल्याने तसे म्हणाले लागत आहे.
निती आयोगाच्या सूचनेकडे सरकारच्या पद्धतीने पाहिले जाईल त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातूनही पाहिले पाहिजे. उद्याच्या प्रकल्पांसाठी आज जर जमीन घ्यायची असेल तर त्याची अधिक वाच्यता होता कामा नये. सरकारच्या लोकांना जी गुप्ततेची शपथ दिली जाते त्यामध्ये सरकारी माहितीचा गैरवापर होऊ नये असे पाहिले जात असते. म्हणजे समजा आज नाशिकमधील शंभर एकर जमीन सरकारला घ्यायची असेल तर त्याची वाच्यता झाली तर त्या जमिनीचे भाव वाढतात त्याचबरोबर अनेक धनदांडगे लोकांना आमिष दाखवून किंवा प्रसंगी धाक दाखवून त्या जमिनी आपल्या ताब्यात घेत असतात. त्यानंतर त्या जमिनी सरकारला विकून ते त्यातून मोठा नफा कमावतात. यावर सरकार म्हणून काही तरी प्रतिबंध असला पाहिजे. त्याचबरोबर कोणतीही जमीन घेताना तिचा सरकारी आणि खाजगी यापैकी कोणाला अधिक फायदा आहे, हेही पाहिले पाहिजे. सरकार म्हणजे एखाद्या खाजगी व्यक्तीला जमिनी रिकाम्या करून किंवा उपलब्ध करून देणारी संस्था नव्हे. याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे.
कधीकधी सरकार आपल्या पुढील प्रकल्पासाठी जमीन घेईल व नंतर ती एखाद्या खाजगी विकासकाच्या घशात घालेल, असे होता कामा नये. यावर इतर सरकारी यंत्रणांनी लक्ष ठेवले पाहिजे. या जमिनींचे अधिग्रहण होताना आपल्या राज्याच्या पुढील पिढ्यांचाही विचार करायला हवा. देशात जेव्हा सुरुवातीच्या काळात धरणे व इतर प्रकल्प आणण्यात आले, तेव्हा येणार्‍या पिढ्यांना त्याचा किती फायदा होईल हे पाहिले गेले होते. तशाच प्रकारचे कार्य आताही होणे अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांच्या काही माफक अपेक्षा असतात. त्यातील पहिली अपेक्षा ही योग्य मोबदला आहे. मात्र, सरकार म्हणून केवळ इतकाच विचार करणे योग्य होणार नाही. शेतकर्‍याकडून आपण जेव्हा जमीन घेत असतो तेव्हा केवळ जमिनीचा एक तुकडा घेत नाही. त्याचा व त्याच्या येणार्‍या पिढ्यांचा चरितार्थच काढून घेत असतो. त्यामुळे प्रकल्पात मोबदला आणि त्या बदल्यात इतर जमीन हेही धोरण असले पाहिजे. आपल्या देशातील व्यक्तीची जमीन काढून घेऊन त्याला वार्‍यावर सोडून देणे सरकार म्हणून योग्य होणार नाही. दुसरी एक महत्त्वाची अपेक्षा असते ती रोजगारांची. कोणत्याही प्रकल्पातून किती रोजगारनिर्मिती होणार आहे व ती कोणत्या पद्धतीची होणार आहे, याचा विचार सरकारने केला पाहिजे.
जमिनी काढून घेऊन नंतर त्या भागातील तरुणांना कोणत्या तरी खाजगी व्यक्तीच्या तात्पुरत्या काम देणार्‍या एजंटांच्या हातात सोपवणे योग्य होणार नाही. कोकण रेल्वे जेव्हा आली होती त्यावेळी झालेल्या विविध करारमदारांचा काही प्रमाणात कोकणातील सुशिक्षित तरुणवर्गाला लाभ झाला होता. कोकण रेल्वेवर अनेक तरुण हे टीसी वा इतर पदांवर आले. त्याचा त्यांना,
त्यांच्या कुटुंबांना आणि त्यांच्या गावातील अर्थव्यवस्थेलाही फायदा झाला होता. निती आयोग या सार्‍या गोष्टींचा विचार करत असणारच. कारण त्या पदावरील व्यक्ती या सर्व क्षेत्रातील सुज्ञ आणि सुशिक्षित असतात. प्रसंगी सरकारच्याही विरोधात जात त्यांना खडे बोल सुनावणार्‍या चांगल्या अधिकार्‍यांची आज गरज निर्माण झाली आहे. ते त्यांचे काम योग्य पद्धतीने करतील ही खात्री आहे. प्रकल्प नको असे कोणी म्हणणार नाही. मात्र, प्रकल्प कसे आणि कोणत्या पद्धतीचे यावेत याबाबत चर्चा करणे नागरिक म्हणून आपला अधिकार आहे. सर्व देश अपांपरिक ऊर्जा स्रोताचा विचार करत असताना, जागतिक तामानाच्या वाढीचा गंभीर प्रश्न जगासमोर उभा राहिला असतांना आपण जर जंगले तोडून पारंपारिक जलविद्युत प्रकल्प राबवत असो त्यातही तो केवळ खाजगी विकासक राबवत असेल तर त्यावर चर्चा व्हायला हवी. जेव्हा कोयना धरण बांधण्यात आले होते. त्या काळात ती सर्वात आधुनिक आणि अधिक मागणी पूर्ण करणारी प्रणाली होती. बरे ते धरण कोणा एकाचे नव्हते. ते आपल्या राज्याचे होते. त्यामुळे त्यावेळेसची जनभावना वेगळी होती. आता आपल्याला सौर व इतर हरितऊर्जेचे पर्याय खुले असताना आपल्या राज्यातील नवसंपदा नष्ट करण्याला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे जर सरकारचा पाठिंबा असेल तर ते सारेच संशयाच्या भोवर्‍यात येणारे ठरते. भविष्यात या सर्व बाबींचाही विचार व्हावा.

Recommendations of NITI Aayog

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *