थंडीचा कडाका वाढताच ऑनलाइन योग वर्गार्ंची क्रेझ

घरबसल्या नागरिकांकडून आरोग्याची काळजी

नाशिक : प्रतिनिधी
शहरात थंडीचा कडाका वाढू लागल्याने सकाळी लवकर घराबाहेर पडून मैदानावर किंवा उद्यानात व्यायामासाठी जाणे अनेकांना त्रासदायक वाटते. व्यायामासाठी जाताना तयारी करण्याचे अडचणीचे वाटते. जिम किंवा योगा क्लासेसला जाण्यासाठी त्या प्रकारचे कपडे, शूज, पाणी बॉटल, नॅपकिन आदी साहित्य घेऊन जावे लागते. विशेषतः महिलांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी योगा किंवा व्यायामासाठी ग्राउंडवर जाणे टाळले जाते.
यावर पर्याय म्हणून नाशिककरांमध्ये सध्या घरबसल्या ऑनलाइन योग वर्गांची मोठी क्रेझ पाहायला मिळते. गुगल मीट आणि झूम यांसारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून थंडीतही आपला व्यायामाचा नित्यक्रम कायम ठेवण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्र आहे.
हिवाळ्यात शरीर आक्रसून गेल्यासारखे वाटते आणि आळस येतो. मात्र, थंडीच्या दिवसांत व्यायाम आणि योगासने करणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. पहाटेच्या गारव्यात बाहेर पडण्याऐवजी घरातील उबदार वातावरणात राहून योग करण्यास नोकरदार, महिला व ज्येष्ठ नागरिक पसंती देत आहेत.
या ऑनलाइन वर्गांमध्ये प्रामुख्याने शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण करणार्‍या आणि रक्ताभिसरण वाढवणार्‍या आसनांवर भर दिला जात आहे. यात सूर्यनमस्कार, ताडासन, उत्कटासन आणि त्रिकोणासन यांसारख्या आसनांचा समावेश आहे. यासोबतच कपालभाती आणि भस्त्रिका यांसारख्या प्राणायामामुळे शरीरात आतून ऊब निर्माण होऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. थंडीच्या शांत वातावरणात ध्यानधारणा केल्याने मानसिक प्रसन्नता लाभते. योगानंतर हर्बल चहा किंवा हळदीच्या दुधासारख्या उबदार पेयांच्या सेवनाने दिवसभर उत्साह टिकतो. वेळेची बचत आणि थंडीपासून बचाव होत असल्याने या डिजिटल योग वर्गांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

स्वतःसाठी वेळ काढणे अवघड असते. जिम किंवा योगा क्लासेसला जाणे वेळखाऊपणाचे काम वाटते. त्यामुळे सकाळच्या वेळेत लवकर उठून ऑनलाइन योग वर्गाला जॉइन होणे सोपे वाटते. घरातच असल्याने क्लास संपल्यावर लवकर इतर कामांना वेळ देता येतो.
– जयश्री विंचूरकर, गृहिणी

थंडीच्या दिवसांत आळस झटकूून शरीर आणि मनात ऊर्जा निर्माण करण्यासाठी योग अत्यंत प्रभावी ठरतो. बाहेरच्या गारव्यामुळे अनेकांना घराबाहेर पडणे अडचणीचे वाटते. मात्र, ऑनलाइन वर्गामुळे नागरिक घरबसल्या नियमित सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यानाचा लाभ घेत आहेत. – कविता कुलथे, योगशिक्षिका

 

 

Online yoga classes become a craze as the cold weather worsens

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *