15 डिसेंबरपर्यंत सर्व विभागांना कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यातील संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने डिजिटल तंत्रज्ञानासह आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीला वेग दिला आहे. घाट, रस्ते, वाहनतळ आणि गर्दी नियंत्रणाच्या ठिकाणांची आभासी प्रतिकृती तयार करणार्या डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी सर्व विभागांना 15 डिसेंबरपर्यंत आराखडे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
बैठकीस पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, अतिरिक्त आयुक्त तथा अपर जिल्हाधिकारी उदय किसवे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भदाणे, पोलिस उपायुक्त किरण चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत आणि कुंभमेळा तहसीलदार मकरंद दिवाकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विभागप्रमुख व सल्लागार उपस्थित होते.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, वाहतूक नियोजन आणि स्वयंसेवक प्रशिक्षण या चार स्तरांवर तयारी सुरू आहे. डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाद्वारे गर्दीच्या संभाव्य स्थितीचे आकलन करून पर्यायी मार्ग आणि सुरक्षिततेचे नियोजन करता येणार आहे. पाऊस व धरणातून होणारा विसर्ग लक्षात घेऊन घाटांवरील पूरस्थितीचा अंदाज घेण्यावरही भर आहे. त्याचवेळी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी, मनुष्यबळ, साधनसामग्री आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचा समावेश असलेला कृती आराखडा सादर करायचा आहे. स्वयंसेवकांना प्राथमिक उपचार, सीपीआर, जलबचाव आणि गर्दी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन कुंभमेळ्यातील प्रत्यक्ष कामासाठी सज्ज केले जात
आहे.
पूरस्थितीचा आधीच अंदाज घेणार
पावसाची नोंद आणि धरणांतून सोडण्यात येणार्या पाण्याची माहिती एकत्रित करून घाटांवरील संभाव्य पूरस्थितीचा अंदाज घेण्याचे नियोजन आहे. कोणत्या घाटावर पाणी पोहोचण्याचा धोका आहे, तेथील भाविकांची संख्या किती आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी किती वेळ लागेल, याचे विश्लेषण करता येणार आहे. त्यानुसार भाविकांचे आगमन नियंत्रित करून सुरक्षित स्थलांतराची व्यवस्था करता येईल.
बचावकार्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करता यावी, यासाठी स्वयंसेवकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे. पाण्यात बुडणार्या व्यक्तीचे बचावकार्य, जखमी व बेशुद्ध व्यक्तींना सुरक्षितपणे हलविणे, बांबू आणि दोरीच्या साहाय्याने स्ट्रेचर तयार करणे, सीपीआर देणे तसेच अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण यात समाविष्ट आहे. 18 ते 50 वयोगटातील महिला आणि पुरुषांना या शिबिरात सहभागी होता येणार आहे.
डिजिटल ट्विनमुळे आपत्तीचे पूर्वानुमान
सिंहस्थ कुंभमेळ्यातील प्रमुख घाट, रस्ते, वाहनतळ आणि होल्डिंग एरियाची आभासी प्रतिकृती तयार करून गर्दी व वाहतुकीचे विश्लेषण केले जाणार आहे. एखाद्या ठिकाणी गर्दी वाढल्यास किंवा मार्ग बंद करावा लागल्यास त्याचा आसपासच्या परिसरावर होणारा परिणाम आधीच समजणार आहे. त्यानुसार पर्यायी मार्ग आणि वाहतुकीचे नियोजन करता येईल. सध्याच्या एकात्मिक नियंत्रण व आदेश केंद्राशी या प्रणालीची जोडणी करण्याबाबतही चर्चा झाली.
840 स्वयंसेवकांना प्रशिक्षण
सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या मदतीसाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी तयार केली जात आहे. भोंसला शिक्षण संस्थेत आयोजित कुंभपर्व शिक्षण शिबिराच्या चार सत्रांमध्ये आतापर्यंत 840 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला आहे. सहा दिवसांच्या निवासी प्रशिक्षणात नेतृत्वगुण, सांघिक कार्य, प्राथमिक उपचार, सीपीआर, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे.
Use of Digital Twin Technology at Simhastha