विकासकामांना जुन्या देयकांचा विळखा; लोकप्रतिनिधी आक्रमक
नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीत (डीपीसी) नाशिक जिल्ह्यासाठी यंदा एक हजार 551 कोटींचा भरीव निधी मंजूर झाला असला, तरी यातील 50 टक्के निधी मागील दोन वर्षांतील प्रलंबित देयके (दायित्व) अदा करण्यातच खर्च होणार आहे. सर्वसाधारण आराखड्यासाठी मंजूर 965 कोटींपैकी 448.76 कोटी जुन्या कामांवर खर्च होणार असल्याने नवीन विकासकामांना मोठी कात्री लागणार आहे. या गंभीर मुद्द्यावरून शुक्रवारी (ता. 27) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरत संताप व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक आराखड्याची बैठक पार पडली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आराखड्यात 106.55 कोटींची (7.38 टक्के) वाढ झाली असली, तरी सन 2024-25 आणि 2025-26 मधील अनियमिततेमुळे दायित्वाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वसाधारण उपयोजनेतील एकूण नियतव्ययाच्या 46.5 टक्के निधी केवळ जुनी देणी भागवण्यासाठीच जाणार असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसण्याची चिन्हे आहेत.
वाढत्या दायित्वामुळे उर्वरित निधीतून नवीन विकासकामे कशी मार्गी लावणार? दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाययोजना आणि जनावरांच्या चार्याच्या प्रश्नासाठी निधी कोठून उपलब्ध करणार? अशा प्रश्नांंची सरबत्ती लोकप्रतिनिधींनी बैठकीत केली. मात्र, प्रशासकीय अधिकार्यांना यावर ठोस उत्तर देता न आल्याने लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कालमर्यादेत कामे पूर्ण करा
पालकमंत्री महाजन नोव्हेंबरअखेरपर्यंतच्या निधी वितरणाचा आढावा घेतला असता, सर्वसाधारण योजनेतील 448.76 कोटींच्या दायित्वापैकी आतापर्यंत 152.72 कोटी रुपये अदा करण्यात आले असून, अद्याप 296.04 कोटी देणे बाकी आहे. नवीन कामांसाठी 52.49 कोटी वितरित झाले असून, जुन्या दायित्वासह एकूण 205.21 कोटींचे वितरण झाले आहे. दायित्वाचा हा मोठा भार लक्षात घेता सर्व शासकीय यंत्रणांनी निधी खर्चाच्या कालमर्यादेचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
आदिवासी व अनुसूचित जाती उपयोजनेची स्थिती चिंताजनक सर्वसाधारण योजनेप्रमाणेच आदिवासी आणि अनुसूचित जाती उपयोजनेवरही जुन्या दायित्वाचा मोठा भार आहे.
आदिवासी उपयोजना : 215 कोटींच्या जुन्या दायित्वापैकी केवळ 63.73 कोटी वितरित झाले असून, 151.27 कोटी अद्याप शिल्लक आहेत. नवीन कामांवरील 88.05 कोटींसह आतापर्यंत एकूण 151.78 कोटींचे वितरण झाले आहे.
अनुसूचित जाती उपयोजना : या योजनेतील स्थिती अधिकच चिंताजनक असून, 33.01 कोटींच्या जुन्या दायित्वापैकी केवळ 3.85 कोटींचेच वाटप झाले आहे, तर 29.16 कोटींंची देयके अद्याप प्रलंबित आहेत.
आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या जिल्हाधिकार्यांना कानपिचक्या
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. डॉ. राहुल आहेर आपल्या मतदारसंघातील अडचणींबाबत बोलत असताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पालकमंत्री महाजन एकमेकांच्या कानात काही कुजबुजत होते. त्यावेळी डॉ. आहेर यांना संताप अनावर होऊन जिल्हाधिकार्यांना मोठ्या आवाजात ’मी बोलत आहे आणि तुमचे लक्ष नाही,’ असे सांगत राग व्यक्त केला. तेव्हा जिल्हाधिकार्यांनी बोलण्याकडे लक्ष असल्याचे स्पष्ट केले.
डीपीडीसी आराखडा आणि प्रमुख प्रकल्प
♦ एकूण वार्षिक अर्थसंकल्प : 1,551 कोटी (मागील वर्षापेक्षा 106.55 कोटींची वाढ)
♦ कुंभमेळा विकास निधी : 35,000 कोटी (रिंगरोडसाठी 7,500 कोटी, एसटीपीसाठी 2,200 कोटी)
♦ प्रवर्गनिहाय स्पिल (शिल्लक दायित्व): सर्वसाधारण 448.76 कोटी, आदिवासी उपयोजना 215 कोटी, अनुसूचित जाती 33.01 कोटी
♦ इतर महत्त्वाच्या तरतुदी : बिबट्या प्रतिबंधक उपाययोजना (17 कोटी), 358 एआय अंगणवाड्या (13 कोटी), शासकीय कार्यालये सौरऊर्जा (13 कोटी), रेशीम उद्योग (2.28 कोटी), ध्वजदिन निधी सुपूर्द (1.56 कोटी).
♦ नवीन प्रकल्प : सुरगाणा (उदमाळ) येथे स्ट्रो टुरिझम, देवळालीत 38 हजार झाडांचे मियावाकी जंगल व बटरफ्लाय गार्डन, नांदूरमध्यमेश्वर व ममदापूर येथे ’एंड टू एंड’ विकास, स्वातंत्र्यवीर सावरकर म्युझियम व पंचमुखी त्र्यंबकराजाची प्रतिकृती.
बैठकीत झालेले आरोप
♦ जिल्हा परिषद शाळांचा निधी वळवला : शासनाच्या 5 टक्के निकषाप्रमाणे जिल्हा परिषद शाळांसाठी 44 कोटी मिळणे अपेक्षित असताना, निधीकपात करून तो इतरत्र वळवल्याचा आरोप करण्यात आला. वर्गखोल्यांअभावी आजही मंदिरांत शाळा भरत असल्याचे लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणले.
♦ आदिवासी तालुक्यांत अवैध धंदे आणि पोलिसांची वसुली : गुजरात सीमेवरून सापुतारा-वणी आणि पेठमार्गे गुटखा, मटका व दारूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. महामार्गावर गाड्या उभ्या करून गुजरातमधून येणार्या भाविकांकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी केली.
♦ प्रशासनाची मनमानी आणि ठेकेदारांशी मिलिभगत : गेल्या दोन-अडीच वर्षांत डीपीसी कामकाजात चुकीच्या सवयी लागल्या असून, पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधींच्या शिफारशींशिवाय परस्पर ठेकेदारांच्या मर्जीने कामे दिली जात असल्याचा आरोप करत पुराव्यांचा गठ्ठा सादर करण्याची तयारी आमदारांनी दर्शवली.
Half of the funds from the ₹1,551 crore plan spent on previous projects