कोणिसाव्या शतकातील अज्ञान, विषमता आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला खडबडून जागे करणारे युगप्रवर्तक दांपत्य म्हणजे महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले! स्त्रीशिक्षणाचे जनक, सार्वत्रिक शिक्षणाचे कृतिशील पुरस्कर्ते, सतीप्रथा, केशवपन व बालविवाह यांसारख्या अनिष्ट रूढींना आव्हान देणारे थोर समाजसुधारक आणि बहुजन उद्धाराचे अग्रदूत म्हणून त्यांचे कार्य ऐतिहासिक आहे.
दि. 28 नोव्हेंबर रोजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करणे, हा महाराष्ट्राच्या समाजसुधारणा चळवळीचा वारसा जपण्याचा दिवस आहे. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे चिमणाबाई आणि गोविंदराव यांच्या पोटी झाला. त्यांचे मूळ आडनाव ’गोर्हे’ होते. फुलांचा व्यवसाय केल्यामुळे ’फुले’ हे आडनाव रूढ झाले. बालपणीच आईचे छत्र हरपल्यानंतर ’आऊ’ सगुणाबाई यांनी त्यांच्या संगोपनाची आणि जडणघडणीची मोठी जबाबदारी निभावली. मुन्सी बेग व लिजिटसाहेब यांच्या पुढाकारामुळे त्यांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले आणि 1841 मध्ये त्यांनी मिशनरी शाळेतून इंग्रजी माध्यमातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
सोबत लहुजीबुवांकडून तालमीचे, कुस्तीचे व दांडपट्ट्याचे धडेही घेतले. थॉमस पेन यांच्या ’राइट्स ऑफ मॅन’ या ग्रंथातून विषमता ही ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहे, याची जाणीव त्यांना झाली. एका मित्राच्या लग्नाच्या वरातीत झालेल्या जातीय अपमानानंतर त्यांनी बहुजन आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा निर्धार केला. ’जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाते उधारी’ या जाणिवेतून त्यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंना घडवून त्यांनी शिक्षिकेची जबाबदारी दिली. समाजाचा विरोध आणि घराबाहेर पडावे लागण्याचा प्रसंगही त्यांनी धैर्याने पेलला. 1851 मध्ये चिपळूणकरांच्या वाड्यात दुसरी शाळा सुरू करत त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा पाया रचला.
गौतम बुद्ध आणि संत कबीर यांच्या समतावादी परंपरेला पुढे नेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यांना आपले गुरू मानले. महात्मा फुले यांनी लेखणीलाही परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र बनवले. ’शेतकर्यांचा असूड’, ’गुलामगिरी’, ’ब्राह्मणांचे कसब’, ’सार्वजनिक सत्यधर्म’, ’तृतीय रत्न’ आणि ’शिवाजी महाराजांचा पोवाडा’ यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी व्यवस्थेतील विसंगतींवर बोट ठेवले. बहुजनांना संघटित करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि जलशांच्या माध्यमातून प्रबोधन केले. ’माती आडवा, पाणी जिरवा’ हा जलसंधारणाचा विचार, तसेच शेती व सिंचनाविषयीची मांडणी करून त्यांनी शेतकर्यांचे प्रश्न ठामपणे मांडले. विधवा पुनर्विवाहाला पाठबळ, 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना आणि त्यातील काशीबाईच्या मुलाला-यशवंतला दत्तक घेऊन डॉक्टर घडवणे, हा त्यांच्या माणुसकीचा सर्वोच्च आविष्कार ठरला. 1868 मध्ये घराचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून त्यांनी समतेचा प्रत्यक्ष वस्तुपाठ दिला. ईश्वर एक असून, सर्व माणसे समान आहेत, हा ’सार्वजनिक सत्यधर्माचा’ संदेश आज अंधश्रद्धा व थोतांडांविरोधात अधिकच प्रासंगिक ठरतो. सन 1860 मध्ये फुलेंनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. तर सन 1863 मध्ये महात्मा फुलेंनी घरीच ’बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केले. त्यावरून पुण्यातील वातावरण काही काळ बिघडले. याच गृहात प्रसूत झालेल्या एका ब्राह्मण विधवा काशीबाईंच्या मुलाला यशवंत याला फुले दापत्याने ’दत्तक’ घेऊन त्याला डॉक्टर केले.सन 1864 मध्ये त्यांनी पुण्यात सारस्वत जातीतील एक पुनर्विवाह घडवून आणला. सन 1868 मध्ये जोतिरावांंच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच वर्षी त्यांनी आपल्या घराचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. वडिलांच्या श्राद्धाचे जेवण भाऊबंदांना घालण्याऐवजी जोेतिरावांनी आंधळ्यापांगळ्यांना घातले. जोेतिरावांंच्या समाजकार्याला सहचारिणी सावित्रींची साथ होती. असं म्हणतात, ’प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो.’ क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी पती महात्मा जोेतिरावांच्या समाजकार्यात आपल्या आयुष्याचा पवित्र समिधा टाकल्या. 11 मे 1888 मध्ये जनतेने कोळीवाड्यात सभा घेऊन जोतिराव फुले यांनी केलेल्या महनीय कार्याबद्दल त्यांना ’महात्मा’ ही पदवी बहाल केली. त्यांच्या कार्याचा गौरव करत 11 मे 1888 रोजी जनतेने त्यांना ’महात्मा’ ही पदवी दिली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र, समता आणि मानवतेची त्यांची मशाल आजही समाजाला मार्ग दाखवत आहे.
Mahatma Jotirao Phule, a Pioneer of Social Change