वीकेंडमुळे पर्यटन चिंब!

पहिने, भावली धरण,वाढोलीत गर्दीचा पूर
स्थानिक व्यावसायिकांची पर्वणी
ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
तरुणांकडून हुल्लडबाजीचे प्रकार
धबधब्यावर भिजण्याचा लुटला आनंद

नाशिक : देवयानी सोनार
पावसाने उसंत घेतल्याने आणि रविवारच्या सुट्टीमुळे काल त्र्यंबकेश्‍वर परिसरात पहिने, ब्रह्मगिरीचा परिसर तसेच इगतपुरी तालुक्यताील भावली धरणावर पर्यटनस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली.
त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात सर्वत्र हिरवेगार डोंगर, डोंगरावरुन कोसळणरे धबधबे, अधून मधून येणार्‍या पावसाच्या सरी अंगावर झेलत आणि पर्यटन स्थळी असलेल्या गरमा गरम भजी, मक्याचे कणिस याचा आस्वाद नागरिक, महिला, युवक, युवतींनी फुल टू धम्माल केल्याचे चित्र काल पाहावयास मिळाले. पहिने बारीत गर्दीमुळे वाहतुकीचीही कोंडी झाल्याचे चित्र होते. तर वाढोली येथील प्रतिकेदारनाथ मंदिर भागात किमान दोन ते तीन हजार भाविक दिवसभरात दर्शनाला येऊन गेल्याने या परिसरातही मोठी गर्दी पाहावयास मिळाली.

 

 

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होत होता. दोन दिवसांपासून काहीशी उघडीप मिळाली. त्यात काल रविवार असल्यामुळे सुटीचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्यासाठी निसर्गप्रेमींची मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते. त्र्यंबकेश्‍वर तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभलेले असल्याने या भागात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी पसंती दिसून येते.

 


वाढोलीत भक्तीचा पूर
वाढोली येथे असलेले प्रतिकेदारनाथ मंदिरही निसर्गाच्या सानिध्यात आहे. गेल्या काही वर्षात याठिकाणी भाविकांचा राबता वाढला आहे. त्यातच पावसामुळे हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटला आहे. त्यामुळे दर्शनाबरोबरच या भागात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी काल पाहावयास मिळाली. स्थानिक व्यावसायिकांची यामुळे चांगलीच पर्वणी झाल्याचे चित्र होते. नाशिकमधील सोमेश्‍वर धबधबा परिसरातही काल मोठी गर्दी पाहावयास मिळाली. गंगापूर रोडवर असलेल्या सोमेश्‍वर धबधब्याजवळ पोलिसांनी बॅरिकेडिंग लावली आहे. सोमेश्‍वर धबधब्याजवळ तसेच सोमेश्‍वर मंदिर परिसरात मोठी गर्दी होती.

सोमेश्‍वर मंदिर तसेच त्र्यंबकेश्‍वर भागात रविवारच्या सुटीमुळे प्रेमीयुगुलांचीही मोठी गर्दी पाहावयास मिळाली. सोमेश्‍वर धबधबाजवळ पोलिसांनी बॅरिकेंडीग केलेले असल्यामुळे काहींचा हिरमोड झाला.


गोदाकाठ की सर्व्हिस स्टेशन
गोदेचा पूर ओसरल्यामुळे काल अनेक वाहनधारकांनी गोदाघाटावर वाहने धुण्यासाठी गर्दी केली होती. काल रविवारमुळे महापालिकेचे कोणी कर्मचारी अथवा स्वच्छता दूत याठिकाणी नव्हते. त्याची संधी साधत अनेकांनी वाहने धुण्याचा आनंद लुटला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *