डाव अखेर उधळला

पाकिस्तानचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू असलेले इम्रान खान यांचे सर्व डावपेच निकामी ठरल्याने देशाचे माजी पंतप्रधान होण्याची वेळ त्यांच्यावर आली. शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांनी खेळी केली, तरी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने त्यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावेच लागले. पाकिस्तानची संसद असलेल्या नॅशनल असेंब्लीत आपला पराभव लांबविण्यात ते यशस्वी झाले. भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानला स्वातंत्र्यानंतर कधीही राजकीय स्थिरता लाभलेली नाही. कधी लष्करी, तर कधी संसदीय राजवट पाकिस्तानी जनतेच्या नशिबी आलेली आहे. दोन्ही प्रकारच्या राजवटींत पाकिस्तानी लोकांचे मूलभूत आर्थिक प्रश्न सुटलेले नाहीत. महागाई हा तेथील लोकांचा एक मोठा प्रश्न आहे. याच प्रश्नावरुन विरोधी पक्षांनी त्यांच्या सरकारविरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. शाहबाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ), बिलावल भुत्तो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांनी अविश्वास ठराव दाखल केला. सत्ताधारी आघाडीतील काही छोटे पक्षही विरोधकांना मिळाल्याने इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले होते. त्याचवेळी त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी राजीनामा देण्याचे टाळून विरोधकांच्या हाती सत्ता जाणार नाही, यासाठी घटनेची पायमल्ली केली. पाकिस्तानच्या संसदेचे उपाध्यक्ष कासिम सूरी यांनी इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव घटनाबाह्य ठरवून फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी मान्य केली. त्यामुळे विरोधकांना खेळ संपल्याचे बोलले जात होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करुन इम्रान खान यांची खेळी घटनाबाह्य ठरविली. इम्रान खान यांनी आपल्या मर्जीतील माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद यांची काळजीवाहू पंतप्रधानपदी नेमणूक करण्याची सूचना केली होती. त्यानुसार अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी कार्यवाही केली. कोणत्याही परिस्थितीत विरोधकांच्या हाती सत्ता जाणार नाही, हाच त्यांचा डाव सर्वोच्च न्यायालयात उधळला गेला.

  • 12 ते 14 वयोगटातील 1.81 कोटींहून अधिक बालकांचे लसीकरण
    इतिहास कायम
    संसद विसर्जित करण्याचा कासिम सुरी यांचा निर्णय रद्दबातल ठरवत सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास प्रस्ताव दाखल करुन त्यावर चर्चा करुन मतदान घेण्याचा आदेश दिल्याने इम्रान खान यांचे सर्व डावपेच उधळले गेले. त्यांच्याविरोधात संसदेमध्ये अविश्वास ठराव शनिवारी मांडण्यात आला. रात्री उशिरा अविश्वास ठरावाच्या बाजूने 174 सदस्यांनी इम्रान बाजूने मतदान केल्याने इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले. अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात येणारे इम्रान खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. पाकिस्तानच्या कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नसल्याचा संसदीय इतिहासही कायम राहिला आहे. आपला पराभव होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ते अनुपस्थित राहिले. त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानादरम्यान सभात्याग केला. त्यामुळे एकूण 342 सदस्यांच्या संसदेमध्ये 174 मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. अविश्वास ठराव मंजूर होण्याआधीच इम्रान खान यांनी संसदेतील पंतप्रधानांसाठी असलेली जागाही सोडलेली होती. त्याआधी त्यांच्या पक्षाचेच संसद अध्यक्ष असाद कासर आणि उपाध्यक्ष कासिम सुरी यांनी आपला राजीनामा संसदेसमोर सादर केला. याचवेळी सरकारचा पराभव निश्चित झाला होता. विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला तेव्हाच इम्रान खान यांचे राजकीय भवितव्य निश्चित झाले होते. तरीही त्यांनी संसदेचे उपाध्यक्ष कासिम सुरी यांना हाताशी धरुन अविश्वास प्रस्ताव घटनाबाह्य ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनेत्यांना देशद्रोही ठरविले. सरकारविरुध्द बोलणार्या विरोधकांना देशद्रोही ठरविण्याची लोकशाही देशांत एक फॅशन झाली असल्याचे इम्रान खान यांनी यानिमित्ताने अधोरेखित केले. अमेरिकेच्या मदतीने आपल्या सरकारविरुध्द कट रचण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. हा आरोप अमेरिकेने फेटाळून लावला. युक्रेन युध्द सुरू झाले असताना इम्रान खान यांनी रशियाला भेट दिली होती. रशियाशी जवळीक वाढविण्याचा त्यांचा हा एक प्रयत्न होता. अमेरिकेने पाकिस्तानला आतापर्यंत बरीच मदत केलेली असताना इम्रान खान अमेरिकेच्याच विरोधात जात होते. आता त्यांना पायउतार व्हावे लागल्याने विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजवावी लागणार आहे.
    अस्थिरतेची शक्यता
    पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या पक्षाचे नेते शाहबाज शरीफ यांचे नाव विरोधकांनी पंतप्रधानपदासाठी सुचविले असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधानांची निवड संसदेत मतदानाने केली जाणार असल्याने इम्रान खान यांना आणखी एक खेळी खेळण्याची संधी आहे. पंतप्रधान निवडीच्या वेळी त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष असेल. इम्रान खान यांचा पराभव झाला असला, तरी पाकिस्तानातील अस्थिरता संपलेली नाही. विरोधकांचे सरकार येईल की नाही? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. पहिला पर्याय विरोधक सरकार स्थापन करुन संसद आणखी दीड वर्षे चालवू शकतील. विरोधकांनी सरकार स्थापन केले, तर इम्रान खान यांच्यावर राजकीय सूड उगवला जाण्याची शक्यता आहे. दुसरा पर्याय नव्याने निवडणुका घेण्याचा आहे. सर्व विरोधक एकत्र राहणे मुश्कील असल्याचेही बोलले जात आहे. लष्कर सत्ता ताब्यात घेणार काय? हा नेहमीचाच प्रश्न आहे. सरकार पडलेच आणि राजकीय गोंधळ, अस्थिरता निर्माण झाली, तर लष्कर गप्प बसणार नाही. पाकिस्तानी जनतेला लष्करी आणि संसदीय राजवट अशा दोन्हींचा अनुभव आहे. पाकिस्तानातील लोकशाही नेहमीच धोक्यात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
  • हे ही वाचा
  • अधिकाराचा वाद
  • पोलिसाने चाकूने वार केलेल्या सासऱ्याचा मृत्यू

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *