ठक्कर बझार बसस्थानक बनले चोरांचे माहेरघर!

सीसीटीव्ही यंत्रणा बंद; अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरातील ठक्कर बझार बसस्थानकावर दररोज मोठी गर्दी असते. या गर्दीचा गैरफायदा घेऊन अनेक चोर प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारत असल्याच्या घटना घडत आहेत. शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनाही या चोरांचा फटका बसला. बसमध्ये चढताना त्यांच्या खिशातील रोकड चोरट्याने लांबवली. त्यानंतर त्यांनीं लागलीच पोलीस ठाणे गाठले. स्थानक प्रमुखांकडे जाऊन सीसीटीव्हीची तपासणी करण्याचा प्रयत्न केला.
स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने त्यांना धक्का बसला.
सप्तशृंगगडावरील आई भगवतीची यात्रा संपली. त्यानंतर कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने लाखो भाविकांची गर्दी ही नाशिक येथील परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती स्थानक असल्यामुळे रोजच दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर व सप्तशृंंगगडावर हजारो भाविक आणि प्रवासी हे ठक्कर बझार या स्थानकावरून जीव मुठीत धरून बसमध्ये चढउतार करतात. भविष्यात सिंहस्थ कुंभमेळा येऊ घातला आहे. अजूनही जुन्या बसस्थानकाचे काम झालेले नाही. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्वच प्रवाशांना ठक्कर बझार बसस्थानकाचाच आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे मोठी गर्दी याठिकाणी असते. या गर्दीचा गैरफायदा घेत काही सराईत महिला आणि पुरुष सामुदायिकपणे चढउतार करणार्‍या प्रवाशांमध्ये दाटीवाटी करून घुसखोरी करून कोणाचा खिसा, कोणाचे पाकीट, कोणाचा किमती मोबाइल, तर महिलांचे दागिने, सोनसाखळी, हातातील किमती बांगड्यासुद्धा कापून काही सेकंदात जागेवरून पसार होतात.
कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने भरलेल्या यात्रेनंतर नाशिक येथील मध्यवर्ती स्थानकाच्या आवारात प्रवाशांची तुडुंब गर्दी होती. परिवहन महामंडळाने जागोजागी सर्वत्र सीसीटीव्ही बसवलेले आहेत. अगदी आठही दिशा आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवरील खांबाला लावलेले आहेत. मात्र, हे कॅमेरे निव्वळ शोभेचे बाहुले आहेत. शनिवारी (दि. 11) श्री. जाधव दुपारी चारच्या सुमारास दवाखान्याचे काम उरकून ठक्कर बझार स्थानकावर नाशिक-नंदुरबार बसमध्ये चढत असताना एकाने त्यांच्या खिशातून अलगद पैसे काढून काही सेकंदात तेथून पोबारा केला. ही बाब लक्षात आली असता, जाधव यांनी आरडाओरड केली. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या खिशात फक्त सुटे 11 रुपये होते. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलूस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी तक्रारीची तातडीने दखल घेत ठाणे अंमलदाराला बोलावून मध्यवर्ती स्थानक क्रमांक 1 वरील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासण्यासाठी तत्काळ कार्यवार्ही केली. परंतु रेकार्ड रूममध्ये जाऊन बघितले तर संपूर्ण कार्यप्रणालीच बंद असल्याचे निदर्शनास आले.
अधिक तपास केल्यावर समजले की, तीन दिवसांपासून सर्व कॅमेरे बंद असल्याने फुटेज बघता आले नाही. प्रवाशांनी हिंमत करून तक्रार दाखल करूनही हाती काहीच लागले नाही. तुम्ही सोमवारी चक्कर मारा, अशी बोळवण करून पाठविण्यात आले. पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी आपुलकी दाखवत चहापाणी करून भाड्याला पैसे नसतील तर मी देतो, असे म्हणत तुम्ही काळजी करू नका. आम्ही तपास करून तुम्हाला कळवतो, असे आश्वस्त केले.

ठक्कर बझार बसस्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही बंद असणे गंभीर बाब आहे. नागरिकांचा मोठा राबता याठिकाणी असतो. काही गंभीर घटना घडल्यास सीसीटीव्हीच बंद असेल तर शोध कसा घेणार? त्यामुळे सीसीटीव्ही तातडीने कार्यरत करण्याची गरज आहे.
– कुबेर जाधव, तक्रारकर्ता

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *