प्रेयसीच्या अंगावर कार घालून प्रियकराने केला खून
सिडको : प्रतिनिधी
वाडीवर्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांजेगाव परिसरात मुकणे धरणाच्या बॅकवॉटरलगत असलेल्या हिरवी मिरची रिसॉर्ट येथे मंगळवारी (दि. 18 ऑगस्ट) दुपारी 34 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सुरुवातीला लोखंडी गेट अंगावर पडून तिचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा अपघात नसून, खून असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी महिलेचा प्रियकर दीपक शिवाजी सौंदाणे (वय 43, रा. नाशिक) याच्याविरुद्ध वाडीवर्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार रूपाली नीलेश पाटील (वय 34, रा. शिवनारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड, नाशिक) या विवाहित महिला एका खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करत होत्या. रूपाली पाटील आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीच्या पर्चेसिंग विभागात काम करणार्या दीपक सौंदाणे यांची सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधात
रूपांतर झाले. रूपाली या नेहमीप्रमाणे सोनोग्राफी सेंटरमध्ये कामावर जात असल्याचे घरी सांगून दीपकला भेटण्यासाठी गेल्या होत्या. दीपक हा त्याच्या चारचाकी वाहनातून रूपालीला घेऊन सांजेगाव येथील हिरवी मिरची रिसॉर्टमध्ये घेऊन जात होता. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाहनातच वाद झाला.रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ वाहन आल्यानंतर रूपाली गाडीतून उतरून लोखंडी गेट उघडत असताना दीपकने रागाच्या भरात तिच्या अंगावर चारचाकी वाहन घातले. यात गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनेनंतर हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, पोलिसांना सुरुवातीपासूनच घटनेबाबत संशय होता. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे, फॉरेन्सिक तपास, तांत्रिक विश्लेषण तसेच रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान संशयित दीपक सौंदाणे याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.वाडीवर्हे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून अपघाताच्या घटनेमागील खुनाचा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणाचा पुढील तपास वाडीवर्हे पोलिस करीत आहेत.
अपघाताचा बनाव; सीसीटीव्हीमुळे खुनाचा उलगडा
मयत रूपाली पाटील यांच्या अंगावर लोखंडी गेट पडून त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे, फॉरेन्सिक तपास, तांत्रिक विश्लेषण आणि हिरवी मिरची रिसॉर्टबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासातून घटना अपघात नसून, खून असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संशयित प्रियकर दीपक सौंदाणे याला पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.